धाराशिव, (प्रतिनिधी)- सध्याच्या तरुण पिढींमध्ये संत आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा अभाव जाणवत आहे. त्यामुळेच समाजातील हिंदू मुली, महिला आणि समाजावर संकटे येत असल्याची खंत समाजमनात आहे. समाजाने वेळीच जागरूक होऊन आपल्या हिंदू संस्कृतीचे जतन आणि संवर्धन केले तर पुन्हा शिवछत्रपतींचे स्वराज्य निर्माण होण्यास वेळ लागणार नाही असे मत हभप. संभाजी महाराज साळुंखे यांनी व्यक्त केली.
धाराशिव शहरातील बालाजी नगर मधील श्री स्वामी समर्थ मंदिर येथे शुक्रवार, 1 मे रोजी सायंकाळी सकल हिंदू समाज व हिंदू संमेलन संयोजन समितीच्या वतीने आयोजित हिंदू संमेलनात ते बोलत होते. संमेलनाचे अध्यक्ष स्थानी संतोष क्षीरसागर हे होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते ॲड. रवींद्र कदम यांची प्रमुख वक्ते म्हणून उपस्थिती होती.
संमेलनात प्रमुख वक्ते ॲड. रवींद्र कदम म्हणाले की, समाजाच्या आचरणात आमूलाग्र बदल घडवून आणून देशाला विकसित, संघटित, सुरक्षित आणि आत्मगौरवाने परिपूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पंच परिवर्तन आचरणात आणणे गरजेचे आहे. समाजातील जातीभेद, उच्च-नीचता मिटवून सर्वांना मित्र मानणे. हिंदू समाजाची मंदिरे, पाणी आणि स्मशान सर्वांसाठी समान असावे, ही समरसतेची भावना रुजली पाहिजे. आज विभक्त कुटुंब पद्धतीमुळे मूल्यांचा ऱ्हास होत आहे. कुटुंबात एकत्र बसून संवाद साधणे, नवीन पिढीला भारतीय संस्कृती, संस्कार आणि मूल्यांची ओळख करून देणे आवश्यक आहे. पाणी वाचवणे, प्लास्टिकचा वापर टाळणे आणि जास्तीत जास्त झाडे लावणे हे प्रत्येक स्वयंसेवकाचे आणि नागरिकाचे कर्तव्य आहे. निसर्गाचे रक्षण केल्यासच मानवजातीचे अस्तित्व टिकणार आहे. तसेच आपली भाषा, पोशाख, भजन, भोजन आणि भ्रमण यामध्ये भारतीयत्वाला प्राथमिकता देणे, परकीय वस्तूंचा त्याग करून स्थानिक उत्पादनांचा वापर वाढवला पाहिजे. ही पंच परिवर्तनाची संकल्पना सर्वांनी आपल्या दैनंदिन जीवनात, आपल्या घरात आणि समाजात अमलात आणल्यास आपण भारताला 'परम वैभव' नक्कीच देऊ शकतो, असे सांगून संत आणि छत्रपती शिवराय यांच्या कालखंडातील काही प्रसंग उपस्थितितांसमोर मांडून शिवरायांप्रमाणे जागृत राहण्याबाबत आवाहन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री स्वामी समर्थ मंदिर समिती, हिंदू संमेलन संयोजन समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी तीनशेहून अधिक समाजबांधव, नागरिक उपस्थित होते.
