भूम (प्रतिनिधी)-  तालुक्यातील वंजारवाडी परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून शांत असलेल्या बिबट्याने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. 2 मे रोजी पहाटेच्या सुमारास बिबट्या सदृश्य वन्यप्राण्याने एका गायीवर हल्ला करून तिला ठार केल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात पुन्हा एकदा भीतीचे सावट पसरले असून, वनविभागाने तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

वंजारवाडी येथील खरात वस्तीवर महादेव खरात यांचा पशुधनाचा गोठा आहे. नेहमीप्रमाणे त्यांनी आपली जनावरे गोठ्यात बांधली होती. मात्र, 2 मे रोजी पहाटेच्या सुमारास त्यांना आपली एक गाय गोठ्यात दिसून आली नाही. सुरुवातीला गाय दोरी तोडून सुटली असावी, असा अंदाज खरात यांनी बांधला. परंतु, परिसरात शोध घेत असताना शेतात काही अंतरावर गायीला ओढत नेल्याच्या खुणा घसरत गेल्याच्या खुणा त्यांना दिसून आल्या. पुढे जाऊन पाहणी केली असता, बिबट्याच्या हल्ल्यात गाय मृत अवस्थेत पडलेली आढळली.


वनविभागाकडून पंचनामा

घटनेची भीषणता पाहून महादेव खरात यांचा मुलगा मन्मथ खरात यांनी तात्काळ उपसरपंच प्रभाकर डोंबाळे यांना माहिती दिली. उपसरपंचांनी घटनेचे गांभीर्य ओळखून वन अधिकारी दांडगे यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि मृत गायीचा व परिसराचा पंचनामा केला. बिबट्याचा वावर स्पष्ट झाल्याने वनविभागाने या ठिकाणी बिबट्याच्या हालचाली टिपण्यासाठी ट्रॅप कॅमेरे बसविले आहेत.


शेतकऱ्यांची नुकसानीची मागणी

ऐन उन्हाळ्यात शेतीची कामे सुरू असतानाच बिबट्याने हल्ला केल्याने शेतमजूर आणि शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. “आधीच दुष्काळी परिस्थिती आणि त्यात हातातील पशुधनाचा असा अंत झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे,“ अशा भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तात्काळ आर्थिक मोबदला द्यावा आणि बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान गेले दीड महिन्यापूर्वी तालुक्यातील बऱ्हाणपूर उळुप चिंचपूर या परिसरात आढळलेल्या बिबट्याने पुन्हा भूम तालुक्यात एका गाईवर हल्ला केल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.


 
Top