धाराशिव (प्रतिनिधी)- रब्बी हंगाम पुर्व तयारी आढावा बैठक पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीत नेहमीप्रमाणे कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कागदावरील माहिती देवून आपले काम कसे चांगले चालू आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु आमदार कैलास पाटील यांनी यांनी कामाची पोलखोल करून बैठकीत आक्रमकपणे कृषी विभागाच्या अशा कारभारामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत असे सांगितले.

शुक्रवार दि. 1 मे रोजी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीतमध्ये विविध विभागाच्या बैठका झाल्या. कृषी विभागाच्या बैठकीत कृषी विभागातर्फे राबविलेल्या योजनेची माहिती दिल्यानंतर जिल्ह्यात किती शेतकऱ्यांना बी-बियाणे व इतर साहित्याचे किट वाटप केले. यावर कृषी अधिकाऱ्यांनी 56 हजार शेतकऱ्यांना किट वाटप केल्याचे सांगितले. त्यानंतर आमदार कैलास पाटील यांनी गावनिहाय त्याची यादी देवू शकतास का?  असे विचारले असता यादी नसल्याचे सांगत कृषी अधिकाऱ्यांनी यादी उपलब्ध करून घेतो असे सांगितले. यावर आमदार कैलास पाटील यांनी तुम्ही किती शेतकऱ्यांना किट वाटप केले यांची पूरेशी माहिती नाही, भूम येथील गोडाऊनमध्ये अनेक किट शेतकऱ्यांना वाटप करण्याऐवजी तसेच पडून आहेत. त्यामुळे कृषी विभागाचा कारभार फक्त कागदावर असून, प्रत्यक्ष शेतकऱ्यांना यांचा लाभ नाही. असे सांगून खडे बोल सुनावले. याचबैठकीत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पण कैलास पाटील यांचे काही मुद्दे उचलून धरत कृषी विभागाला धारेवर धरले. 

शहरी भागासह ग्रामीण भागाचा पाणी प्रश्न गांभिर्याने घ्या. सध्या 32 टक्के पाणीसाठा असला तरी जूनपर्यत 15 टक्के पाणीसाठा कमी होणार आहे. त्यामुळे आतापासूनच पाणीचे नियोजन करण्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. डीपीडीसीच्या बैठकीत नियोजन अधिकारी गोडसे इतिवृत्त वाचताना आमदार कैलास पाटील यांनी आक्षेप घेतला. गेल्या बैठकीत निर्णय न झालेले विषय इतिवृत्तात कसे काय आले असे विचारले. त्याप्रमाणे कोणत्या योजनेला किंवा कामाला पुर्ननियोजन करताना प्राधान्य दिले पाहिजे हे कळणे महत्वाचे असे सांगत, अनेक जिल्हा परिषद शाळांच्या वर्गखोल्या धोकादायक आहेत. त्याला प्राधान्य देण्याऐवजी दुसऱ्या कामाला प्राधान्य दिल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्याचीही आमदार कैलास पाटील यांनी विविध प्रश्न विचारून धारेवर धरले. वनविभागाच्या अधिकाऱ्याने दिल्या उत्तरावर आमदार कैलास पाटील यांच्यासह पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी संताप व्यक्त करून जिल्हाधिकाऱ्यांनी वन विभागाच्या कामाची चौकशी करावी व एक आठवड्याच्या आता अहवाल द्यावा असे सांगितले. 

 
Top