भूम (प्रतिनिधी)- तालुक्यातील माणकेश्वर येथील सटवाई देवी मंदिरातील मूर्तीवरील शेंदूर काढून रासायनिक पद्धतीने वज्रलेपन करण्यात आल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. दरम्यान, बुधवारी (ता. 14) छत्रपती संभाजीनगर येथील पुरातत्त्व विभागाच्या संचालक जया वाहणे यांनी मंदिराला भेट देऊन मूर्तीची प्रत्यक्ष पाहणी केली.
संचालक वाहणे यांनी मूर्तींचे जतन व संवर्धनासंदर्भातील विविध बाबींचा आढावा घेत वरिष्ठ कार्यालयाकडे पुढील दीड महिन्याच्या कालावधीत अंतिम अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे सांगितले. पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष, अन्य पदाधिकारी व ग्रामस्थांसोबत संवाद साधला.
देवीच्या मूर्तीवर मोठ्या प्रमाणात शेंदूर साचल्याने मूर्तीचे मूळ स्वरूप झाकले गेले होते. त्यामुळे शेंदूर काढण्याची प्रक्रिया पार पाडून मूर्तीचे दीर्घकालीन जतन करण्यात यावे, अशी मागणी भाविकांकडून सातत्याने केली जात होती. शेंदूर काढल्यानंतर देवीच्या मूर्तीचे मूळ रूप अधिक स्पष्टपणे समोर आले आहे. देवीच्या हातातील संगीत, कला व सर्जनशीलतेचे प्रतीक मानली जाणारी वीणा, आध्यात्मिक साधना व ज्ञानाचे प्रतीक असलेली अक्षयमाला (जपमाळ) तसेच मन आणि इंद्रियांवरील नियंत्रणाचे प्रतीक असलेला अंकुश स्पष्ट दिसून येत असल्याचे भाविकांनी सांगितले. या सर्व चिन्हांचा संबंध ज्ञान आणि साधनेशी असल्याने मूर्तीचा ऐतिहासिक व धार्मिक संदर्भ स्पष्ट करणारा अहवाल पुरातत्त्व विभागाने लवकर सार्वजनिक करावा, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.
