तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील ग्रामपंचायत काटगाव येथे मागविलेल्या विविध माहितीबाबत ग्रामपंचायतीकडून देण्यात आलेले 30 दिवसांत माहिती देण्याचे लेखी आश्वासन पूर्ण न झाल्याने ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत कांबळे यांनी आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागण्याचा इशारा दिला आहे. यामुळे काटगाव ग्रामपंचायतीतील कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 16 व 17 एप्रिल 2026 रोजी ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत कांबळे हे विविध मागण्यांसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास बसले होते. यावेळी ग्रामविस्तार अधिकारी व सरपंच यांनी लेखी पत्र देत, कांबळे यांनी मागविलेली माहिती संकलित करून साधारण 30 दिवसांत उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन दिले होते. या पत्राची प्रत गटविकास अधिकारी, पंचायत समिती तुळजापूर यांनाही देण्यात आली होती.
कांबळे यांनी ग्रामपंचायतमधील 2023 पासून आजतागायतच्या कामकाजासंदर्भात तब्बल 11 मुद्द्यांवर विविध माहितीची मागणी केली होती. सदर माहिती विस्तृत स्वरूपाची असल्याने ती गोळा करण्यासाठी अतिरिक्त कालावधी आवश्यक असल्याचे कारण देत प्रशासनाने 30 दिवसांची मुदत मागितली होती. ग्रामविस्तार अधिकारी व सरपंच यांच्या स्वाक्षरीचे लेखी पत्र कांबळे यांना देण्यात आले होते. मात्र, दिलेली मुदत संपूनही अद्यापपर्यंत माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या कांबळे यांनी आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करून न्याय मागणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
या प्रकरणात पंचायत समिती तुळजापूरच्या गटविकास अधिकाऱ्यांनी अपेक्षित कर्तव्य बजावले नसल्याची चर्चा काटगावमध्ये रंगू लागली आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळेच ग्रामस्थांना थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घ्यावी लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे. या प्रकरणी प्रशासनाने तातडीने भूमिका स्पष्ट करून संबंधित माहिती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांतून जोर धरत आहे. आता जिल्हाधिकारी स्तरावर याबाबत कोणती भूमिका घेतली जाते, याकडे काटगावसह परिसराचे लक्ष लागले आहे.