धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव येथे मराठा समाज मंदिरासाठी जागा निश्चित करण्यात यावी.जागा निश्चित झाल्याबाबतचा अहवाल पुढील आठवड्यात सादर करावा तसेच जिल्ह्यातील विकास कामांना गती देण्याचे निर्देश पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.
जिल्ह्यातील विविध विकासकामे, समित्यांच्या नियुक्त्या,अतिवृष्टीग्रस्त कामांची प्रगती,विद्यार्थ्यांच्या नासा अभ्यास दौऱ्याची निवड प्रक्रिया तसेच स्वातंत्र्य सैनिकांच्या विविध प्रश्नांबाबत पालकमंत्र्यांनी मंत्रालयातील त्यांच्या दालनातून दूरदृष्यप्रणालीद्वारे विविध विषयांचा आढावा घेत प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना आज आयोजित बैठकीतून दिल्या.
पालकमंत्री अध्यक्ष असलेल्या विविध समित्यांच्या तसेच विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही पालकमंत्री सरनाईक यांनी यावेळी दिले.जिल्ह्यात विविध तालुक्यांमध्ये सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कामांच्या प्रगतीचाही त्यांनी सविस्तर आढावा घेतला.जिल्ह्यातील 20 विद्यार्थ्यांना अमेरिकेतील नासा अंतराळ संशोधन संस्थेत अभ्यास दौऱ्यासाठी पाठविण्याच्या अनुषंगाने निवड प्रक्रिया जुलै महिन्यात पूर्ण करण्यात यावी,असेही सरनाईक यांनी सांगितले.
वाहतूक नियमांविषयी विद्यार्थ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी तसेच अपघातांचे प्रमाण कमी व्हावे,यासाठी धाराशिव येथे ‘धर्मवीर आनंद दिघे ट्रॅफिक पार्क' उभारण्यासाठी जागा निश्चित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. धाराशिव नगरपालिकेसह जिल्ह्यातील इतर नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रांमध्येही अशा जागा निश्चित कराव्यात. यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल,असेही पालकमंत्री श्री.सरनाईक यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या समस्यांचे तातडीने निराकरण करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी दिल्या. त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात आणि शासनाकडे त्या प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा करावा,असे ते म्हणाले.तुळजापूर येथे प्राणी संग्रहालय उभारण्यासाठी आवश्यक जागा निश्चित करून वन विभागाने पाठपुरावा करावा,असे निर्देश देतानाच नगरपालिका क्षेत्रात मृत पाळीव जनावरांच्या अंत्यसंस्कारासाठी जागा निश्चित करण्यास सांगितले.पाळीव प्राण्यांच्या दहनभूमीसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल,असेही पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी नमूद केले.
यावेळी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी धाराशिव येथे मराठा समाज मंदिरासाठी लवकरच जागेची निवड करण्यात येईल,अशी माहिती दिली.विविध समित्यांच्या नियुक्त्यांसंदर्भातही कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.सप्टेंबर 2025 मधील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या दुरुस्तीसाठी रस्ते,पूल,सिंचन प्रकल्प आणि बंधाऱ्यांच्या कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जलसंधारण विभागाला 16 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहितीही श्री.पुजार यांनी दिली. तसेच प्रत्येक नगरपालिका क्षेत्रात पाळीव जनावरांच्या अंत्यसंस्कारासाठी पाच गुंठे जागा राखीव ठेवण्यात येईल,असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदाळकर यांनी अमेरिकेतील नासा अंतराळ संशोधन केंद्रासाठी जिल्ह्यातील 16 विद्यार्थ्यांची निवड जुलैमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती दिली. धाराशिव येथे आनंद दिघे ट्रॅफिक पार्क उभारण्यासाठी बँक कॉलनी येथे 46 गुंठे जागा निश्चित करण्यात आली असून त्यासंदर्भातील प्रस्ताव नगरपालिका सभागृहात मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती नगर परिषद धाराशिवच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी दिली.
या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता व्ही. एम.भंडे,कार्यकारी अभियंता शिवराम केत,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके,जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे,जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रभाकर महामुनी,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर,नगरपालिका प्रशासन उपायुक्त त्र्यंबक ढेंगळे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.यावेळी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहातून संबंधित अधिकारी उपस्थित होते.
