मुरुम (प्रतिनिधी)- “1944 मध्ये सुरू झालेली प्राथमिक शाळा असो वा 1955 मध्ये स्थापन झालेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर शहर वाचनालय, या संस्थांनी पेरलेल्या विचारांचे आज एका विशाल वटवृक्षात रूपांतर झाले आहे. मुरूम येथील भीमनगर वस्तीने केवळ स्वतःचा विकास केला नाही, तर सामाजिक क्रांतीचा एक नवा वस्तुपाठ देशासमोर मांडला आहे,“ असे गौरवपूर्ण प्रतिपादन माजी मंत्री बसवराज पाटील यांनी केले.
मुरूम (ता. उमरगा) येथे आयोजित भूमिपुत्र अधिकारी-कर्मचारी स्नेहमिलन आणि वस्तीचा इतिहास सांगणाऱ्या भव्य स्मरणिकेच्या प्रकाशन सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष बापुराव पाटील मुरूमकर, राजस्थानच्या राज्यपालांचे सचिव राजकुमार मंगेश सागर, साखर आयुक्तालयाचे माजी सहसंचालक डी. आय. गायकवाड, अप्पर निबंधक राजेश सुरवसे, सिद्धार्थ भालेराव, अशोक गायकवाड, राजेश सुरवसे, राजकुमार सागर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात वस्तीतील नवनियुक्त अधिकारी निखिल लिंबराज मस्के यांची सहाय्यक नगर रचनाकार पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.
आपल्या भाषणात बसवराज पाटील पुढे म्हणाले की, एकाच वस्तीतून तब्बल 48 सुपुत्र आज देशाच्या विविध शासकीय सेवांमध्ये वर्ग-1 आणि वर्ग-2 पदांवर कार्यरत आहेत, ही बाब थक्क करणारी आहे. यामध्ये पोलीस उपायुक्त, सहसंचालक, उपजिल्हा निवडणूक अधिकारी आणि कार्यकारी अभियंत्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे याच मातीतील 16 लेकी आज डॉक्टर म्हणून वैद्यकीय क्षेत्रात नाव गाजवत असून असंख्य तरुण भारतीय सीमेवर देशाचे रक्षण करत आहेत. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे“ हा मंत्र भीमनगरने खऱ्या अर्थाने अमलात आणला आहे. ज्या वस्तीने शून्यातून विश्व निर्माण केले, त्या वस्तीशी माझे नाते केवळ राजकीय नसून ते जिव्हाळ्याचे आहे.
तरुणांना आवाहन करताना त्यांनी “अत्त दीप भव“ या उक्तीप्रमाणे स्वतःचा प्रकाश स्वतः बनण्याचा संदेश दिला. आता केवळ नोकरीसाठी नाही, तर जागतिक दर्जाच्या कौशल्यासाठी सज्ज व्हावे लागेल. व्यसनांपासून दूर राहून चारित्र्य जपत ज्ञानाची उपासना करणे, हीच या परंपरेला खरी मानवंदना ठरेल, असेही त्यांनी नमूद केले. याच कार्यक्रमादरम्यान डॉ. आंबेडकर शहर वाचनालयासाठी विद्यार्थ्यांच्या सोयींसाठी नगराध्यक्ष बापुराव पाटील यांच्या तर्फे 50 हजार रूपये किमतीचे स्पर्धा परीक्षा संच वाचनालयाचे सचिव अण्णाराव कांबळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मदनलाल गायकवाड यांनी केले. तर सिद्धार्थ भालेराव, अशोक गायकवाड, राजेश सुरवसे व राजकुमार सागर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयंत गायकवाड यांनी केले आणि आभार प्राध्यापक महेश कांबळे यांनी मानले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रा. अण्णाराव कांबळे, प्रशांत गायकवाड, प्रणित गायकवाड, आनंद गायकवाड, राहुल गायकवाड, महिंद्र गायकवाड, संदेश सीतापुरे, प्रतीक कांबळे, राजेश कांबळे इत्यादींनी पुढाकार घेतला. या ऐतिहासिक सोहळ्याने भीमनगरच्या संघर्षाचा आणि यशाचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी कोरला गेला आहे. माजी नगराध्यक्ष रशीद भाई शेख, धनराज मंगरूळ, नगरसेवक गणेश अंबर, रूपचंद गायकवाड, भारत गायकवाड, इत्यादी सह मुरूम शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
