आळणी (ता. धाराशिव)  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळणी येथे महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांनी प्रतिमा पूजन करून केली.शाळेचे मुख्याध्यापक बशीर तांबोळी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करून झाली. यावेळी सर्व उपस्थितांनी राष्ट्रीय गीत तसेच राज्य गीताचे सामूहिक गायन करून देशप्रेमाची भावना व्यक्त केली.

यानंतर गावातील प्रतिष्ठित मान्यवर व पालक यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना निकाल पत्रकांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद व उत्साह स्पष्टपणे दिसून येत होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक बशीर तांबोळी यांनी केले. त्यांनी महाराष्ट्र दिनाचे महत्त्व पटवून सांगत विद्यार्थ्यांना आदर्श नागरिक बनण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन दिनेश पेठे यांनी केले, तर आभार प्रदर्शन हनुमंत माने यांनी व्यक्त केले.

यावेळी इयत्ता सहावीतील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त पथनाट्य व देशभक्तिपर गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या सादरीकरणास उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमास ग्रामसेवक  माळी,माजी सरपंच संतोष बप्पा चौगुले, पोलीस पाटील प्रमोद माळी, दादासाहेब गायकवाड, गणेश निंबाळकर, बापू खोबरे, मनोज वीर यांच्यासह ग्रामस्थ, पालक व शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकूणच, महाराष्ट्र दिनाचा हा कार्यक्रम उत्साह, शिस्त व देशप्रेम यांचा सुंदर संगम ठरला. 

 
Top