धाराशिव (प्रतिनिधी)-  श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने चालवले जाणारे तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय आता पूर्णपणे महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने या महाविद्यालयाच्या शासनाकडे हस्तांतरण करण्याच्या महत्वपूर्ण निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे या भागातील शैक्षणिक क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणार असून आपण सातत्याने केलेल्या प्रयत्नांना आता यश मिळाले असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे 

मागील अनेक वर्षांपासून हे अभियांत्रिकी महाविद्यालय मंदिर संस्थानमार्फत चालवले जात आहे. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 8 जुलै 2025 रोजी बैठक झाली होती. त्यात तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय महाराष्ट्र शासनास हस्तांतरित करण्याच्या अनुषंगाने तसेच ही कार्यवाही सुकरपणे पार पडावी याकरिता पाच सदस्यीय तज्ञांची समिती गठित करण्यात आली होती. समितीने ऑगस्ट 2025 मध्ये सादर केलेल्या अहवालानुसार आता उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाला आता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय असा दर्जा मिळणार आहे. यामुळे महाविद्यालयाच्या सक्षमीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. 

शासनाच्या थेट नियंत्रणामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होईल, ज्याचा वापर पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केला जाईल. महाविद्यालयात आधुनिक प्रयोगशाळा, सुसज्ज ग्रंथालय आणि अद्ययावत संगणक कक्ष उपलब्ध होतील. शासकीय दर्जा मिळाल्यामुळे या ठिकाणी अनुभवी आणि तज्ज्ञ प्राध्यापकांची नियुक्ती होण्यास मदत होईल. शासकीय नियमांनुसार शैक्षणिक शुल्कात सवलत मिळणार असल्याने ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल पण गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे अभियांत्रिकी शिक्षण घेणे सहज शक्य होणार आहे. तसेच महाविद्यालयाचा दर्जा सुधारल्यामुळे मोठ्या कंपन्यांमार्फत होणाऱ्या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये वाढ होईल. शासनाच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय हे मराठवाड्यातील एक प्रमुख शैक्षणिक केंद्र म्हणून नावारूपास येईल, असा विश्वासही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.

 
Top