धाराशिव (प्रतिनिधी)- अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ सुधारणा अधिनियम २०१५ ची प्रभावी अंमलबजावणी व्हावी तसेच या कायद्याबाबत व्यापक जनजागृती आणि प्रसार व्हावा, यासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पोलीस विभाग आणि सहायक आयुक्त, समाज कल्याण,धाराशिव कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा शुक्रवार,दि.२९ मे रोजी सकाळी १०.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,धाराशिव येथील सभागृहात होणार आहे.
या कार्यशाळेत अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ सुधारणा अधिनियम २०१५ या विषयावर ॲड.मंजुषा साखरे मार्गदर्शन करणार आहेत. कायद्याची माहिती,त्यातील तरतुदी तसेच नागरिकांचे अधिकार आणि संरक्षण याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यशाळेचा लाभ घ्यावा,असे आवाहन सहायक आयुक्त,समाज कल्याण सचिन कवले यांनी केले आहे.