तुळजापूर (प्रतिनिधी)-   तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे भाड्याच्या बहाण्याने एका वाहनचालकाला बोलावून निर्जन ठिकाणी नेऊन बेदम मारहाण करत लुटल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. 1 मे) भरदिवसा उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे भाविक आणि वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर येथील इर्टिगा वाहन चालक विक्रम प्रकाश टिंगरे हे सोलापूर येथे प्रवासी सोडून परत जात असताना त्यांना व्हॉट्सॲप कॉलद्वारे तुळजापूरहून लातूरला भाडे असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार ते तुळजापुरात पोहोचले. यानंतर त्यांना नळदुर्ग रोड येथे बोलावण्यात आले. तेथे तोंड बांधलेले सहा पुरुष आणि तीन महिला वाहनात बसल्या. त्यांनी चालकाला पुढे निर्जन कच्च्या रस्त्यावर, तीर्थ गावाच्या दिशेने गाडी नेण्यास भाग पाडले.

त्या ठिकाणी नेल्यानंतर चालकाला बेदम मारहाण करण्यात आली. त्याच्याकडील  रक्कम, मोबाईल, कार्ड आणि रोख रक्कम हिसकावून घेतली. मोबाईलमधून सुमारे 28 हजार रुपये काढण्यात आल्याचेही समोर आले आहे. यावेळी आरोपींनी “तू आमच्या महिलेसोबत गैरवर्तन केले” असा खोटा आरोप करत चाकूचा धाक दाखवून धमकावले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रकरणाने अधिकच गंभीर वळण घेतले आहे.

 
Top