धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तींचा वाढता धोका लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,धाराशिव अंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या अत्याधुनिक वाहनांचे पूजन व लोकार्पण 1 मे रोजी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील,माजी आमदार ज्ञानराज चौगुले,जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर,जिल्हा परिषद उपाध्यक्ष उषा गायकवाड,पोलीस अधीक्षक रितू खोखर,अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

 जिल्ह्यात पूरस्थिती,दुष्काळ,आग किंवा इतर नैसर्गिक संकटांना वेगाने तोंड देण्यासाठी “गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण” या योजनेअंतर्गत जिल्हा व तालुकास्तरावर आवश्यक साहित्य,यंत्रसामग्री आणि वाहने खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता मिळाली  देण्यात आली होती.शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव,जिल्हा नियोजन समिती यांच्या निर्देशानुसार ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली.या निविदा प्रक्रियेतून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणासाठी शोध व बचाव कार्यासाठी जिल्हास्तरीय पथकाकरिता एक चारचाकी क्रूझर वाहन तसेच एक हायड्रॉलिक लॅडर वाहन खरेदी करण्यात आले आहे. चारचाकी क्रूझर वाहनामुळे आपत्कालीन परिस्थितीत दुर्गम,पूरग्रस्त किंवा आपत्तीग्रस्त भागात तातडीने पोहोचणे शक्य होणार आहे.

दोरखंड,लाईफ जॅकेट,बोट व इतर बचाव साहित्य वाहून नेण्यासाठी हे वाहन अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.आपत्तीच्या काळात जलद प्रतिसाद देण्यासाठी अशा सक्षम वाहनांची आवश्यकता महत्त्वपूर्ण मानली जाते.तसेच हायड्रॉलिक लॅडर वाहनामुळे उंच इमारती,टॉवर किंवा आग लागलेल्या स्थळी अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी मोठी मदत मिळणार आहे. अग्निशमन,शोध व बचाव मोहिमा अधिक वेगाने आणि सुरक्षिततेने राबविण्यासाठी हे वाहन प्रभावी साधन ठरणार आहे.

जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी ही वाहनसुविधा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, भविष्यातील संकटसमयी नागरिकांच्या जीवितरक्षणासाठी प्रशासन अधिक सज्ज राहणार आहे.आधुनिक साधनसामग्रीच्या माध्यमातून धाराशिव जिल्हा आपत्ती व्यवस्थापनात अधिक गतिमान,सक्षम आणि परिणामकारक बनत असल्याचे या उपक्रमातून दिसून येत असून,यामुळे जिल्ह्याची आपत्कालीन प्रतिसाद क्षमता अधिक प्रभावी होणार आहे.

 
Top