धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला गती जिल्ह्यातील तरुणांच्या हातांना काम मिळावे आणि त्यांनी स्वतःचे उद्योग उभे करावेत, या उद्देशाने भारतीय जनता पक्षाने हाती घेतलेल्या ‘108 नवे उद्योजक’ या उपक्रमाला जिल्हाभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत तब्बल 670 इच्छुकांनी आपले अर्ज सादर केले आहेत. प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करण्यासाठी आणखी सात ते आठ दिवसांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे 1 मे रोजी होणारी निवड प्रक्रिया आता आठवडाभर पुढे ढकलण्यात आली आहे. नाविन्यपूर्ण संकल्पनांवर आधारित अर्जदारांना निवड प्रक्रियेत प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील युवक-युवतींनी केवळ नोकरीच्या मागे न धावता नोकरी देणारे बनावे, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. धाराशिव जिल्हा भाजपच्या माध्यमातून आपण मांडलेल्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारला जात असून, या माध्यमातून स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आलेल्या एकूण 670 अर्जांपैकी निवड झालेल्या 108 उद्योजकांना केवळ मार्गदर्शनच नाही, तर प्रत्यक्ष उद्योग उभा करण्यापर्यंत सर्वतोपरी मदत केली जाणार आहे. कांदा पावडर, सोयाबीन प्रोटीन, चिंच पावडर, मोरिंगा पावडर, ज्वारीचे उपपदार्थ, केशर मशरूम, मोती उत्पादन, खाण्यायोग्य चहाचे कप, प्लास्टिक व लिथियम बॅटरी रिसायकलिंग, बायोमास, हरित इंधन, निर्माल्य व्यवस्थापन, अगरबत्ती निर्मिती, सोलर पॅनल रिसायकलिंग आदी उद्योगांचा यात समावेश आहे.
