भुम (प्रतिनिधी)-  छोट्याशा गावातून व परिस्थितीवर मात करून मोठी स्वप्नं पाहणारी आणि ती सत्यात उतरवणारी “सामिया“जेव्हा राष्ट्रीय स्तरावर झळकते,तेव्हा ती संपूर्ण ईट गावाची मान उंचावते.धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील शेवटचे ईट या गावची सामिया शरीफ अत्तार हिने ही किमया करून दाखवली आहे.नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, भोपाळ(मध्य प्रदेश) या महाविद्यालयात शिक्षण घेतलेली 21 वर्षीय विद्यार्थीनी सामियाने वातावरणानुसार रंग बदलणारे‌‘थर्मोक्रोमिक पफर जॅकेट'तयार करून फॅशन आणि टेक्स्टाइल विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे.

सामियाने डिझाइन केलेले हे जॅकेट सामान्य नाही.ते तापमानानुसार स्वतःचा रंग बदलते.जुलैच्या दमट हवेत पिवळे,जानेवारीच्या गारठ्यात गुलाबी आणि मे महिन्याच्या कडक उन्हात आकाशी रंगाचे होणारे हे जॅकेट जणू ‌‘जिवंत' असल्याचा भास देते. सध्या सोशल मीडिया आणि फॅशन वर्तुळात सामियाच्या जॅकेटची जोरदार चर्चा आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे ईटसारख्या छोट्या गावच्या मातीतूनही जागतिक दर्जाची कल्पकता उभी राहू शकते,हे सामियाने सिद्ध केले आहे.


विज्ञान आणि कलेचा सुरेख संगम

ही केवळ फॅशन नसून विज्ञान, कला आणि पर्यावरणीय संवेदनशीलतेचा संगम आहे. सामियाने ‌‘क्रिस्टल व्हायलेट लॅक्टोन'आधारित थर्मोक्रोमिक डाई तंत्रज्ञान वापरले आहे. थंड वातावरणात एक रंग, शरीराच्या उष्णतेशी संपर्क येताच दुसरा, आणि बदलत्या हवामानात तिसरा रंग असे तीन टप्पे या जॅकेटमध्ये अनुभवता येतात.  तिच्या डिझाइनमध्ये पृथ्वीवरील टेक्टॉनिक प्लेट्सची हालचाल, बदलणारे भू-भाग,सेंद्रिय रचना आणि आधुनिक स्ट्रीटवेअर फॅशन यांची सांगड आहे. त्यामुळे या निर्मितीत तांत्रिक कौशल्यासोबतच कलात्मक विचारांची खोलीही दिसते.


 
Top