तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापूर शहरातील अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असलेले वाहतूक सिग्नल तातडीने कार्यान्वित करावेत तसेच हुतात्मा स्मारक ते चौकी रस्ता त्वरित पूर्ण करण्यात यावा, या मागणीसाठी तुळजापूर येथील रविंद्र ज्ञानोबा साळुंके यांनी  खासदार व आमदार यांच्या निवासस्थानासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भातील इशारा वजा निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, तुळजापूर शहरातील वाहतूक सिग्नल गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे शहरात वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत असून अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. भाविकांची मोठी गर्दी होत असताना वाहतूक नियंत्रणाचा प्रश्न गंभीर बनला असून, भविष्यात जीवितहानी होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

हुतात्मा स्मारक ते किसान चौकी हा महत्त्वाचा रस्ता अद्याप पूर्ण न झाल्याने महिला, लहान मुले आणि भाविकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः गर्दीच्या काळात चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. शहरातील सार्वजनिक बाग-बगीचे देखील दुर्लक्षित अवस्थेत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. अनेक बागा उध्वस्त व ओसाड झाल्याने लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळ्यावर परिणाम झाला आहे. तीर्थक्षेत्र तुळजापूरात दररोज हजारो भाविक येत असताना शहरातील मूलभूत सुविधा दुर्लक्षित राहणे गंभीर बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वाहतूक व्यवस्था, रस्ते आणि सार्वजनिक बागांची तातडीने दुरुस्ती व सुधारणा करावी, अशी मागणी जोर धरत आहे. मागण्या मान्य न झाल्यास द खासदार आणि आमदार यांच्या निवासस्थानासमोर उपोषण करण्यात येणार असल्याचे रविंद्र साळुंके यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रशासन याकडे काय भूमिका घेते याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.


 
Top