तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर शहरातील गट नं. 138/1 मधील कथित बेकायदेशीर विकासकाम, अनधिकृत बांधकामे आणि संशयास्पद खरेदी-विक्री व्यवहार प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या प्रकरणी माजी उपनगराध्यक्ष यांच्यासह 26 जणांविरोधात तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी नगरसेविका सौ.प्रगती गोपाळ लोंढे यांच्यावतिने नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
तक्रारदारांनी दिलेल्या निवेदनानुसार, तुळजापूर येथील गट नं. 138/1 मधील सुमारे 2 हेक्टर 63 आर जमिनीमध्ये बेकायदेशीर विकास आराखडा तयार करून त्याआधारे खरेदी-विक्री व्यवहार करण्यात आले. तसेच या ठिकाणी अनधिकृत बांधकामे, पत्र्याचे गाळे व इतर बांधकामे उभारण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी यापूर्वीही जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांनी अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती गठीत केली होती. तसेच उपविभागीय अधिकारी यांनी तहसीलदार तुळजापूर यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यीय समितीची नियुक्ती केली होती. या दोन्ही समित्यांनी केलेल्या चौकशी अहवालात गंभीर अनियमितता समोर आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनावर सुकन्या कदम,ज्योती कदम,अविदा जगताप,कविता लोंढे,वैशाली लोंढे,दिपाली बर्वे,वनिता कदम,वंदना कदम,रेश्मा कदम,संगीता परदेशी,रेखा भिसे,जयश्री लोंढे,सुवर्णा पेंदे तसेच नगरसेवक अमोल कुतवळ,आनंद जगताप,रणजीत इंगळे,अक्षय परमेश्वर,अमोल जाधव,रमेश चिवचिवे,संजय लोंढे,संभाजी नेपते,किरण कदम,विक्रम कदम,मल्हार बर्वे,दयानंद लोंढे,मयूर कदम,किरण लोंढे,पृथ्वीराज कदम,बाळासाहेब कदम,विलास कदम तसेच जय अंबिका तरुण मंडळाचे संपूर्ण सदस्य व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.या निवेदनाची माहितीस्तव प्रत धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक,जिल्हाधिकारी धाराशिव तसेच पोलीस निरीक्षक तुळजापूर यांना देण्यात आली आहे.
