धाराशिव (प्रतिनिधी)- भूम शहरातील भीमनगर परिसरात दि. 15 मे रोजी पवित्र बौद्ध विहार व बौद्ध समाजावर झालेल्या हिंसक हल्ल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) गटाच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलीस अधीक्षक,धाराशिव यांना निवेदन सादर करण्यात आले.

सदर घटनेत बौद्ध समाजाला लक्ष्य करून नियोजनबद्ध पद्धतीने हल्ला करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला असून, संबंधित आरोपींवर अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, 1989 (ॲट्रॉसिटी ॲक्ट) अंतर्गत कठोर गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. तसेच भारतीय न्याय संहिता अंतर्गत दंगल, तोडफोड, धार्मिक भावना दुखावणे, महिलांवर अत्याचार व जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी गंभीर कलमे लावण्याची मागणीही करण्यात आली आहे.

निवेदनानुसार, दि. 14 मे रोजी अंदाजे 150 ते 200 जणांच्या जमावाने भीमनगर परिसरात घुसून पवित्र बौद्ध विहार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा परिसर, समाजबांधव व महिलांवर हल्ला करत मोठ्या प्रमाणात दगडफेक व तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरात भीती व तणावाचे वातावरण निर्माण झाले असून बौद्ध समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. याशिवाय, भीमनगर परिसरातील निष्पाप बौद्ध तरुणांवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे व F.I.R. No.  303/2026 तात्काळ रद्द करण्यात यावेत, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांना शासनामार्फत आर्थिक मदत व मोफत वैद्यकीय उपचार द्यावेत, नुकसानग्रस्त वाहनांचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी, तसेच संपूर्ण प्रकरणाची चौकशी स्वतंत्र विशेष तपास पथक मार्फत करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. भीमनगर परिसर, पवित्र बौद्ध विहार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास कायमस्वरूपी पोलीस संरक्षण देण्यात यावे तसेच परिसरात तातडीने  कॅमेरे बसविण्यात यावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. या निवेदनावर भीमनगर परिसरातील शेकडो बौद्ध बांधव व महिला भगिनींच्या स्वाक्षऱ्या असून त्यांनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे.

“बौद्ध समाजावरील अन्याय कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. प्रशासनाने तात्काळ व निष्पक्ष कारवाई न केल्यास भूम येथे तीव्र मोर्चा आंदोलन उभारण्यात येईल,” असा इशारा आर.पी.आय. (खरात) गटाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी दिला. यावेळी भीम आर्मीचे महाराष्ट्र अध्यक्ष अशोक कांबळे, आर.पी.आय. (खरात) गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष महावीर गायकवाड,प्रबुद्ध गायकवाड, बाबासाहेब ओव्हाळ, निवृत्ती हौसलमल यांच्यासह अनेक कार्यकर्ते बौद्ध बांधव महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top