भूम (प्रतिनिधी)-   महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने प्रस्तावित केलेला ‌‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम, 2026' हा राज्यातील हजारो हिंदू देवस्थानांचे स्वायत्त अस्तित्व, धार्मिक परंपरा आणि त्यांच्या उत्पन्नाचे पारंपरिक स्रोत संपविणारा असल्याचा गंभीर आरोप केला असून, त्वरीत कायदा मागे घ्यावा. अशी मागणी तहसीलदार यांच्याकडे विविध मंदिर विश्वस्त व हिंदुत्ववादी संघटनेच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून तसेच स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक राजे, सरदार आणि दानशूर व्यक्तींनी मंदिरांच्या दैनंदिन पूजा-अर्चा, धार्मिक विधी, अन्नछत्र, यात्रोत्सव, वेदपाठशाळा आणि सामाजिक कार्यांसाठी मोठ्या प्रमाणात जमिनी इनाम स्वरूपात दिल्या होत्या. या जमिनी केवळ मालमत्ता नसून त्या हिंदू समाजाच्या श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहेत. ‌‘महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, 1950' नुसार मंदिरातील देवता किंवा मूर्ती ही ‌‘कायदेशीर व्यक्ती' मानली जाते आणि इनामी जमिनींची मालकी ही त्या देवतेकडेच असते. मात्र प्रस्तावित कायद्याच्या कलम 3 आणि 4 अंतर्गत ही सर्व इनामे रद्द करून संबंधित जमिनी वहिवाटदार, पुजारी किंवा प्रत्यक्ष ताबेदारांच्या नावे मालकी स्वरूपात वर्ग करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

या कायद्यातील सर्वात आक्षेपार्ह बाब म्हणजे कलम 1 उपकलम 2 अंतर्गत वक्फ बोर्डाच्या अखत्यारीतील जमिनींना या कायद्यातून वगळण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. केवळ हिंदू देवस्थानांच्या जमिनींवरच ‌‘निर्मूलन' प्रक्रिया लागू करणे आणि इतर धर्मीय संस्थांच्या मालमत्तांना संरक्षण देणे, हा प्रकार संविधानातील अनुच्छेद 14 मधील समानतेच्या अधिकाराच्या विरोधात असल्याचा दावा आंदोलकांनी केला. एकीकडे वक्फ मालमत्तांना संरक्षण देण्यात येत असताना दुसरीकडे मंदिरांच्या जमिनी संपविण्यासाठी कायदा आणणे हे योग्य नसल्याचे प्रतिक्रिया देण्यात आली आहे. 

दरम्यान, शासनाने हिंदू देवस्थानांच्या अस्तित्वावर गदा आणणारा हा कायदा रेटण्याचा प्रयत्न केल्यास महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल आणि मंदिरांचे हक्क वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरू, असा इशाराही आंदोलकांनी दिला. यावेळी सुधीर देशमुख, सुमंत देशमुख, हेमंत देशमुख, लक्ष्मीकांत देशमुख, भगवंत पाटील, आनंद बेलसरे महाराज, किरण कुलकर्णी, धनाजी सुपेकर, बाबासाहेब बोराडे, प्रवीण बुरटे, मनीष राजोपाध्याय, पिंटू भारती, दीपक बारबोले, लक्ष्मण काळे, सचिन बारगजे आदी उपस्थित होते.

 
Top