धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत कडधान्य, गळीतधान्य व पौष्टिक तृणधान्य योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेल्या विविध निविष्ठांच्या वाटप प्रक्रियेबाबत प्राप्त तक्रारीची कृषी विभागाकडून सखोल चौकशी सुरू असून, संपूर्ण प्रकरणात पारदर्शकता राखून आवश्यक कार्यवाही केली जात असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिली.
कारी (ता.बार्शी) येथील शेतकरी श्री.अमोल जाधव यांनी दि.5 मे 2026 रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे तक्रार अर्ज सादर केला होता.या तक्रारीत त्यांनी निविष्ठा वाटप प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला असून तालुकानिहाय,मंडळनिहाय तसेच लाभार्थी शेतकरीनिहाय माहितीची मागणी करण्यात आली होती.
या तक्रारीच्या अनुषंगाने उपविभागीय कृषी अधिकारी,धाराशिव यांच्याकडे धाराशिव,तुळजापूर,उमरगा व लोहारा तालुक्यांची चौकशी सोपविण्यात आली आहे.तसेच कृषी उपसंचालक व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे मुरूम,परंडा,कळंब व वाशी तालुक्यांची चौकशी जबाबदारी देण्यात आली असून प्रकरणाची सखोल पडताळणी सुरू आहे.
दरम्यान,संबंधित सर्व तालुका कृषी अधिकाऱ्यांना निविष्ठा वाटपाबाबतची संपूर्ण माहिती,लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या,वितरित करण्यात आलेल्या निविष्ठांचा तपशील तसेच उपलब्ध अभिलेखे तातडीने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.ही माहिती संपूर्ण जिल्ह्यातील विविध तालुके,मंडळे आणि हजारो लाभार्थी शेतकऱ्यांशी संबंधित असल्याने माहितीचे संकलन,पडताळणी व वर्गीकरण करण्यासाठी काही प्रमाणात कालावधी लागत असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अनेक तालुकास्तरावरील कार्यालयांकडून माहिती प्राप्त करण्याची प्रक्रिया सुरू असून माहितीचे स्वरूप मोठे व विस्तृत असल्यामुळे संकलनास काहीसा विलंब होत आहे.मात्र माहिती अचूक व पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर कार्यवाही सुरू असल्याचे कळविले आहे.
तक्रारदार शेतकरी यांना कार्यालयाकडे उपलब्ध असलेली माहिती तत्काळ देण्यात येईल तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालयांकडून प्राप्त होणारी उर्वरित माहिती गुरुवारपर्यंत उपलब्ध करून दिली जाईल,असे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले होते.त्यानुसार आज उपलब्ध असलेली माहिती संबंधितांना प्रदान करण्यात आली असून उर्वरित माहिती प्राप्त होताच नियमानुसार देण्यात येणार असल्याचेही कृषी विभागाने म्हटले आहे.असे असताना कोणतीही पूर्वसूचना न देता काही शेतकऱ्यांनी 18 मे रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात आंदोलन करून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. प्रशासनामार्फत आंदोलनकर्त्यांशी सकारात्मक चर्चा करण्यात आली असून मागणीनुसार उपलब्ध माहिती देण्यात आली आहे.तसेच उर्वरित माहितीही नियमानुसार उपलब्ध करून दिली जाईल, असे पुन्हा स्पष्ट करण्यात आले.
कृषी विभागाकडून संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक चौकशी करण्यात येत असून कोणतीही अनियमितता अथवा त्रुटी आढळून आल्यास संबंधितांवर नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच या प्रक्रियेत सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,धाराशिव यांनी केले आहे.