तुळजापूर (प्रतिनिधी)- माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत मागविण्यात आलेल्या माहितीबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, धाराशिव यांनी उत्तर देताना संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने संपूर्ण संचिका उपलब्ध करून देणे उचित नसल्याचे स्पष्ट केले आहे. तुळजापूर तालुक्यातील शिव रत्न नगर येथील अर्जदारांनी तेरणा डेली फर्टिलायझर्स अँड केमिकल्स या खत उत्पादक कंपनीवर करण्यात आलेल्या कारवाईची माहिती मागितली होती. यासंदर्भात जिल्हास्तरीय भरारी पथकाने तपासणी करून अहवाल सादर केला असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
तपासणीनंतर संबंधित खत उत्पादक कंपनीविरुद्ध कारवाईसाठी अहवाल परवाना अधिकारी तसेच कृषी संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. परवाना अधिकारी यांच्यासमोर सुनावणी सुरू असून आवश्यकतेनुसार खत नियंत्रण आदेश 1985 नुसार पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. दरम्यान, हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्यामुळे सदर संचिका उपलब्ध करून देता येणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.