तुळजापूर (प्रतिनिधी)-   शेतकरी कर्जबाजारी होऊ नयेत असे सरकारला वाटत असेल, तर शेतमालाला योग्य भाव द्यावा. अन्यथा पेरणीपासून कापणीपर्यंतची शेतीतील सर्व कामे रोजगार हमी योजनेतून करून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करावा.  या एका योजनेतून दहा कामे होतील आणि शेतकऱ्यांवरील आर्थिक भार हलका होईल. सध्या मजूर टंचाई हे शेतकऱ्यांसमोरील मोठे आव्हान बनले आहे,” असे प्रतिपादन आमदार बच्चू कडु यांनी केले.

आमदार म्हणून निवड झाल्यानंतर प्रथमच सहकुटुंब तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे येऊन श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कर्जमाफीबाबत बोलताना बच्चू कडू म्हणाले की, कर्जमाफीचा अहवाल मंत्रिमंडळाने मान्य केला असून आता तो सहकार विभागाकडे पाठविला जाणार आहे. त्यानंतर शासन अंतिम निर्णय घेईल. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात यंदा अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले असून, या नुकसानीचाही कर्जमाफी योजनेत समावेश होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी टोल फ्री योजनेची गरज

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने तातडीने टोल फ्री हेल्पलाईन सुरू करावी, अशी मागणी करत त्यांनी सांगितले की, “सरकारने ही योजना राबवली नाही तर आम्ही स्वतः पुढाकार घेऊ. शेतकऱ्याला वेळेत मार्गदर्शन आणि आधार मिळणे अत्यावश्यक आहे.केंद्र सरकारने हमीभावाबाबत घेतलेली भूमिका तितकीशी शेतकरी हिताची नसल्याचे यावेळी स्पष्ट केले. 


एकनाथ शिंदे यांच्या सारखे मुख्यमंत्री होणे आवश्यक

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत बोलताना बच्चू कडू म्हणाले,“एकनाथ शिंदे हे सेवाभावी नेतृत्व आहे. ‌‘एकनाथ' म्हणजे अनाथांचा नाथ. त्यांनी दिव्यांग मंत्रालय निर्माण करून मोठे काम केले आहे. मी जिथे जातो तिथे लोक एकनाथ शिंदे यांचांसारखा मुख्यमंत्री हवा असल्याचे सांगतात. एकनाथ शिंदे सारखा माणूस मुख्यमंत्रीपदी पाहिजे हे बोलणे कुणाला झोंबत असेल तर त्याला आपण काय करणार असे यावेळी स्पष्ट केले. 


मराठा आंदोलन योग्य 

मराठा आरक्षण आंदोलनाबाबत बोलताना त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आदर व्यक्त केला.  ते त्यांच्या जातीतील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकासाठी लढत असल्याने ते अयोग्य नसल्याचे यावेळी म्हणाले. मी दिव्यांग  शेतकरी व कष्टकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढतो  हा वर्ग सर्व जातीत असल्याचे त्यांनी उल्लेख केला  पाहिजे. शेतमालाला योग्य भाव मिळाला तर अनेक सामाजिक प्रश्न आपोआप सुटतील,” असे मत त्यांनी मांडले. यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे, शिवसेना तालुका अध्यक्ष अमोल जाधव, उपतालुकाप्रमुख विकास जाधव पाटील, शहरप्रमुख बापूसाहेब भोसले, दिपक योरात तसेच प्रहार संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top