तुळजापूर (प्रतिनिधी)- नळदुर्ग शहरातून जाणारा जुना राष्ट्रीय महामार्ग त्वरित चालू करून नळदुर्ग वासियांची होत असलेली गैरसोय तात्काळ थांबबावी या व अन्य मागण्यांसाठी महाविकास आघाडी नळदुर्ग शहरच्या वतीने दिनांक 17 रोजी नळदुर्ग बस स्थानका समोर संविधान चौकात सकाळी 11 वाजता, एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना शिवसेनेचे प्रशांत नवगिरे म्हणाले की, नळदुर्ग शहरातून गेलेला राष्ट्रीय महामार्ग बाह्यवळण रस्ता केल्यामुळे मुर्टा पाटी ते खंडोबा पणन येथून बंद करण्यात आला आहे. तो रस्ता त्वरित चालू करावा. यामुळे शहराचे महत्व कमी होत आहे . बाजारपेठेवर परिणाम होत आहे.
शहरातील व्यापार ही बंद पडण्याच्या मार्गावर असल्याने नागरिकांना व व्यापाऱ्यांना याचा त्रास होत आहे. खाजगी ट्रॅव्हल्स ही रस्ता नसल्याने शहरात न येता बाह्यवळण महामार्गानेच त्या पुढे जातात . ऑटोरिक्षा व छोटी वाहने यांनाही मुर्टा पाटी व खंडोबा पणन कडून नळदुर्ग शहरात जाण्यायेण्यासाठी रस्ता नसल्याने अनेक अडचणी येत आहेत . परिणामतः प्रवाशांची कुचंबणा होत आहे . यामुळे जुना राष्ट्रीय महामार्ग चालू होणे गरजेचे आहे.
या रास्ता रोको आंदोलनावेळी बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते प्रशांत नवगिरे पुढे असेही म्हणाले की, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जनतेच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये,जर हा महामार्ग त्वरित चालू करणेबाबत कार्यवाही न झाल्यास, शिवसेना संबंधितांना आक्रमकपणे धडा शिकवेल व संबधीत अधिकाऱ्यांचे प्रसंगी प्रकल्प संचालकांचे ही कपडे आम्ही फाडू. असा गंभीर इशाराही प्रशांत नवगिरे यांनी दिला आहे. नळदुर्ग शहरातून गेलेला जुना रस्ता हा पुन्हा पूर्ववत चालू करावा यामुळे नागरिकांचे व्यापाऱ्यांचे वैयक्तिक शहराचे नुकसान होत आहे, ते आम्ही खपवून घेणार नाही. असेही नवगिरे यांनी सांगितले .
यावेळी शिवसेना उबाठा उपजिल्हाप्रमुख तथा जि. प. सदस्य डॉ. जितेंद्र कानडे, शेतकरी संघटनेचे प्रदीप जोशी, नगरसेवक मारुती खारवे, नगरसेवक व ईमाम शेख, संतोष पुदाले, यांनीही मार्गदर्शन केले. या रास्तारोको वेळी जळकोट अणदुर व अक्कलकोट कडे जाणाऱ्या वाहनांची मोठी कोंडी झाली होती. मागण्यांचे निवेदन नळदुर्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांना देण्यात आले.रास्ता रोकोस धाराशिव जिल्हा शिवसेना (ठाकरे) उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर जितेंद्र कानडे,धाराशिव जिल्हा शिवसेना (ठाकरे ) नेते प्रशांत नवगिरे,शिवसेना तुळजापूर तालुका शेतकरी सेना प्रमुख बाळकृष्ण घोडके,कृष्णात मोरे,अनिल छत्रे, नळदुर्ग शहर शिवसेना (ठाकरे ) प्रमुख संतोष पुदाले, सरदार सिंग ठाकूर,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नगरसेवक मारुती खारवे, नगरसेवक इमाम शेख, नगरसेवक सुधीर पोतदार, नगरसेवक आकाश कुलकर्णी,नसीर इनामदार,फारुख कुरेशी, शेतकरी संघटनेचे दिलीप जोशी,शिवसेनेचे राजेंद्र जाधव,दत्ता भोसले, कल्याण करपे, बालाजी गायकवाड, अमित शेंडगे,श्याम कनकदर, ओंकार कलशेट्टी, सोमनाथ म्हेञे व सज्जाद मोजन, अहमद इनामदार, समीर शेख, साजिद काजी, उपस्थित होते.
