कळंब (प्रतिनिधी)- तालुक्यातील भाटशिरपूरा येथे जुन्या वादातून घडलेल्या तरुणाच्या खून प्रकरणात संशयित म्हणून अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. हा निकाल शुक्रवारी (दि. 15 मे) रोजी जाहीर करण्यात आला.
सन 2022 मध्ये भाटशिरपूरा येथे जुन्या वैमनस्यातून एका तरुणाच्या पोटात चाकू भोसकून खून करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणी मयताच्या चुलत चुलत्यांनी शिराढोण पोलीस ठाण्यात उत्रेश्वर उर्फ बाबा बापुराव झोंबाडे व कैलास महादेव लोंढे यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याची सुनावणी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात झाली. सत्र न्यायाधीश आर. के. राजेभोसले यांनी प्रकरणातील सर्व साक्षीपुरावे, कागदपत्रे तसेच अभियोग पक्षाने तपासलेल्या एकूण 14 साक्षीदारांच्या साक्षींचे बारकाईने परीक्षण केले.
सुनावणीदरम्यान साक्षीदारांच्या जबाबांमध्ये विसंगती आढळून आली. तसेच महत्त्वाच्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी अभियोग पक्षाच्या कथनास पूर्ण पाठिंबा दिला नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. याशिवाय वैज्ञानिक व परिस्थितीजन्य पुरावेही निर्णायक स्वरूपाचे नसल्याचे स्पष्ट झाले.
त्यामुळे आरोपींविरुद्ध दोष सिद्ध होण्यासाठी आवश्यक असलेला ठोस, विश्वासार्ह व निर्विवाद पुरावा अभियोग पक्ष सादर करू शकला नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. परिणामी उत्रेश्वर उर्फ बाबा बापुराव झोंबाडे व कैलास महादेव लोंढे या दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या प्रकरणात अभियोग पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकिलांनी कामकाज पाहिले. तर आरोपींच्या वतीने ॲड. एस. एस. तांबे व ॲड. डी. एन. गोंड यांनी बाजू मांडली. ॲड. के. जी. डिकले यांनी त्यांना सहकार्य केले.