तुळजापूर (प्रतिनिधी)-  हिंदू धर्मीयांमध्ये अत्यंत पवित्र मानला जाणारा अधिकमास यंदा रविवार, 17 मेपासून सुरू होत असून 15 जून 2026 रोजी समाप्त होणार आहे. या काळात मोठ्या प्रमाणावर कुलधर्म, कुलाचार, पूजा-अर्चा, दानधर्म आणि धार्मिक विधी केले जात असल्याने तुळजापूरसह परिसरातील मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे.

अधिकमास साधारणपणे तीन वर्षांनी एकदा येतो. ‌‘अधिक' म्हणजे अतिरिक्त किंवा जादा. वर्षातील नेहमीचे बारा महिने असताना हा तेरावा महिना येत असल्याने त्याला अधिकमास म्हटले जाते. ग्रामीण भागात याला ‌‘धोंडा महिना' असेही संबोधले जाते. भारतीय शक संवत्सराचे वर्ष 355 दिवसांचे, तर इंग्रजी कालगणनेनुसार वर्ष 365 दिवसांचे असते. या दोन्ही कालगणनांमध्ये दरवर्षी सुमारे 10 दिवसांचा फरक पडतो. हा फरक तीन वर्षांत सुमारे 30 दिवसांचा, म्हणजेच एका महिन्याएवढा होतो. हा फरक भरून काढण्यासाठी अधिकमासाचा समावेश केला जातो.

धार्मिक मान्यतेनुसार, प्रत्येक महिन्यात सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. मात्र या तेराव्या महिन्यात सूर्यसंक्रांत होत नसल्याने याला पूर्वी ‌‘मलमास' असे म्हटले जात असे. पुराणकथेनुसार, या महिन्याला श्रीकृष्णांनी स्वीकारून ‌‘पुरुषोत्तम मास' हे नाव दिले. त्यामुळे या महिन्यात केलेले दान, धर्म, जप, तप, ध्यान, पूजा-अर्चा यांना विशेष पुण्यप्राप्ती होते, अशी श्रद्धा आहे. धार्मिक विधींना विशेष महत्त्व असल्याने अधिकमासात कुलधर्म व कुलाचार, तीर्थस्नान, दानधर्म, जप-तप व ध्यान, भागवत पारायण, अन्नदान यांना विशेष महत्त्व दिले जाते.. अधिक मास मध्ये महिलावर्ग मोठ्या प्रमाणावर कुलधर्म कुलाचार करतात या कालावधीत महिलावर्ग तीर्थक्षेत्रे जाऊन दिवे अनारसे  मनोभावे अर्पण करतात.तुळजापूरातील श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात या कालावधीत भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित  आहे.


 
Top