तुळजापूर (प्रतिनिधी) - भाविकांना सुलभ, सुरक्षित व सुव्यवस्थित दर्शन व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी आज सकाळी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. मंदिर संस्थानचा सुरक्षा विभाग, स्वच्छता विभाग, तुळजापूर नगरपरिषद तसेच पोलीस प्रशासन यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.
या मोहिमेदरम्यान महाद्वार रोड, भवानी रोडसह मंदिराकडे जाणाऱ्या तिन्ही प्रमुख मार्गांवरील अतिक्रमणे हटविण्यात आली. तसेच श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या प्रशासकीय कार्यालय परिसरातील अनधिकृत अतिक्रमणे काढण्यात आली. मातंगी मंदिरातून बाहेर पडण्याच्या मार्गावरील अडथळेही दूर करण्यात आले. या कारवाईत तुळजापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे विश्वस्त विनोद गंगणे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन चौधर यांच्यासह मंदिर संस्थान, नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
या मोहिमेमुळे मंदिर परिसरातील प्रमुख मार्ग अतिक्रमणमुक्त होण्यास मदत झाली असून भाविकांची ये-जा असणाऱ्या मार्गात मोठी सुधारणा होणार आहे. फेरीवाले व व्यावसायिकांनी सार्वजनिक मार्गांवर अतिक्रमण करू नये तसेच श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कोणताही त्रास होणार नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन नगराध्यक्ष तथा विश्वस्त विनोद गंगणे यांनी केले. भाविकांच्या सुविधेसाठी भविष्यातही अशा प्रकारच्या अतिक्रमण हटाव मोहिमा नियमितपणे राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

