पुणे (प्रतिनिधी)- 18 व्या शतकात ज्या काळात स्त्रियांसाठी प्रगतीची दारे बंद होती, त्या काळात आपल्या न्याय, नीती आणि कर्तृत्वाच्या जोरावर सलग 28 वर्षे आदर्श प्रशासन राबवून राज्यकारभार करणाऱ्या लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा वारसा पुण्यात पुन्हा एकदा जिवंत झाला. पुण्यश्लोक फाउंडेशनच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित त्रिशताब्दी जयंती वर्ष सोहळा राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते पुण्यश्लोक महानाट्य या महानाट्यातील अहिल्यास्तोत्र या समूहगीताचे ध्वनीमुद्रण आणि अहिल्यादेवींच्या जीवनावरील गीतांचे प्रमोशन यावेळी करण्यात आले. अहिल्यादेवींचा इतिहास केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न ठेवता तो जागतिक स्तरावर नेण्याचा निर्धार या व्यासपीठावरून करण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कर्तृत्वाची यशोगाथा आणि होळकरशाहीचा ज्वलंत इतिहास पुण्यश्लोक महानाट्याच्या माध्यमातून सातासमुद्रापार घेऊन जाण्याचा आमचा संकल्प पुण्यश्लोक फाउंडेशनचे अध्यक्ष धनंजय तानले यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून केला.
कार्यक्रमाचे अध्यक्षपद विधानसभेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी भूषवले. तर कार्यक्रमाचे उद्घाटन महाराज यशवंतराव होळकर यांनी केले तर प्रमुख पाहुणे म्हणून खा. रामराव वडकुते, आ.गोपीचंद पडळकर बारगळ घराण्याचे वंशज अमरजीत राजे बारगळ, नितीन वाघमोडे (आयकर आयुक्त), राजेंद्र कुऱ्हाडे (जीएसटी सह आयुक्त), ज्ञानदेव पडळकर अधीक्षक अभियंता महावितरण, यांची विशेष उपस्थिती होती.
महानाट्य आता सातासमुद्रापार
यावेळी महाराज यशवंतराव होळकर यांनी शुभेछा देवून मनोबल वाढविले तर विधानसभेचे सभापती राम शिंदे यांनी व्यस्त वेळातून उपस्थिती लावून कौतुक करू उत्साह वाढविला. खासदार रामराव वडकुते यांनी या महानाट्याचे प्रयोग थेट अमेरिकेत करण्याची जबाबदारी स्वीकारल्याने उपस्थितांमध्ये मोठा उत्साह संचारला.
तर आमदार गोपीचंद पडळकर यांनी हे महानाट्य महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी शासन दरबारी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी त्रिशताब्दी वर्षानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला. यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक श्रीराम पुंडे, युवराज जरग (अधीक्षक अभियंता), स्नेहलता गावडे (कार्यकारी अभियंता), ऋषिकेश परांजपे (लेखक), गणेश इनामदार (दिग्दर्शक), राष्ट्रीय कीर्तनकार मोरेश्वर जोशी, सामाजिक कार्यकर्त्या गिरीजा जोशी, उद्योजक दीपक करगळ, कीटक शास्त्रज्ञ डॉ. शरद गलांडे आणि इतर मान्यवरांचा समावेश होता.
सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी
केवळ भाषणेच नव्हे तर भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांनी बालगंधर्वचे सभागृह दुमदुमून गेले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनंजय तानले यांनी केले, तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेंद्र गाडेकर, विकास माने, भुजंगराव दुधाळ आणि दीप्ती तानले यांच्यासह संपूर्ण पुण्यश्लोक फाउंडेशनच्या टीमने परिश्रम घेतले. या सोहळ्याला विवेक बिडगर, रोहिदास गोरे, अशोक शेजाळ, नागेश वसतकर, सूर्यकांत गोफणे, यांसह समाजबांधव आणि शिव-अहिल्या प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकूणच, हा सोहळा केवळ एक जयंती उत्सव न ठरता, अहिल्यादेवींच्या विचारांचा जागर करणारा एक ऐतिहासिक क्षण ठरला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विकास माने यांनी केले.