धाराशिव (प्रतिनिधी)- बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत स्थापन झालेल्या धाराशिव तालुक्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या कार्याची जागतिक बँकेच्या तज्ज्ञांनी पाहणी करत समाधान व्यक्त केले.ग्रामीण भागात उभारण्यात आलेल्या या प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ होत असल्याचे नमूद करत तज्ज्ञांनी कंपन्यांच्या कामकाजाचे विशेष कौतुक केले.धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळे येथील पिकलँड फार्मर प्रोड्यूसर कंपनी तसेच किणी येथील वरदविनायक फार्मर प्रोड्यूसर कंपनी येथे 5 मे रोजी जागतिक बँकेच्या तज्ज्ञांनी भेट दिली.या भेटीदरम्यान कंपनीने आतापर्यंत केलेल्या उल्लेखनीय कार्याचा आढावा घेण्यात आला.
जागतिक बँकेचे तज्ज्ञ आदर्शकुमार यांनी पिकलँड फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या बियाणे प्रक्रिया युनिट व गोदाम बांधकामाची पाहणी केली.तसेच वरदविनायक फार्मर प्रोड्यूसर कंपनी,किणी येथील 20 टीपीडी क्षमतेच्या अत्याधुनिक ‘फुली ऑटोमॅटिक’ दाळ मिल प्रकल्पाची माहिती घेतली. हे दोन्ही प्रकल्प पूर्णत्वास जाऊन कार्यान्वित झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
या भेटीदरम्यान विभागीय नोडल अधिकारी लातूर भास्कर कोळेकर,जिल्हा प्रकल्प अमलबजावणी प्रमुख तथा प्रकल्प संचालक आत्मा विष्णू मिसाळ, नोडल अधिकारी चंद्रकांत माळी,नोडल अधिकारी पुणे राजेंद्र साळवे,जिल्हा नोडल अधिकारी चेतन जाधव, जिल्हा व विभागीय अमलबजावणी कक्षातील अधिकारी व कर्मचारी, टीम,तसेच संबंधित कंपनीचे संचालक व सभासद उपस्थित होते.