धाराशिव (प्रतिनिधी)-  ज्येष्ठ साहित्यिक, समाजसेवक, शिक्षणप्रेमी व क्रीडाप्रेमी श्री. कुंडलिक लिंबाजी गोरे यांच्या गाजलेल्या नाटकांच्या पुस्तकांचे प्रकाशन समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. साहित्य, संस्कार आणि समाजकार्य यांचा सुंदर संगम असलेल्या या कार्यक्रमाने उपस्थितांना प्रेरणा दिली.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर गाव व देशाच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. विनय आपसिंगकर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ. सुमन शिवानंद चंद्रेश्वर, आबा देवकर, श्री. संतोष बोबडे तसेच 197879 बॅचचे सहकारी तसेच श्री. माणिक पाटील, श्री. रामदास गोरे, श्री. हिराचंद पाटील आदी मान्यवरांचीही उपस्थिती लाभली.

प्रास्ताविक करताना श्री. गणेश चादरे यांनी श्री. कुंडलिक गोरे यांच्या कार्याचा सविस्तर आढावा घेताना सांगितले की, गोरे यांनी आपल्या लेखणीद्वारे ग्रामीण समाजातील वास्तव, वेदना, संस्कार आणि परिवर्तनशील विचारांना प्रभावी अभिव्यक्ती दिली असून त्यांच्या साहित्यकृती समाजमनाला विचार करायला भाग पाडणाऱ्या व जागरूकता निर्माण करणाऱ्या आहेत. तसेच सामाजिक कार्य, शिक्षणप्रसार आणि क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे समाजविकासात महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

यानंतर डॉ. दयानंद हाके यांनी सन्मानपत्राचे वाचन केले.  या सोहळ्यात श्री. गोरे यांच्या “बाई बाटली पुढाऱ्यानी गाठली”, “तुळस हसली अंगणी” आणि “हे फूल गुलाबाचे”. या तीन गाजलेल्या नाटकांच्या पुस्तकांचे प्रकाशन डॉ. विनय आपसिंगेकर, सौ सुमन चंद्रशेखर व आबा देवकर यांच्या हस्ते करण्यात आले.  कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. तसेच गावातील सेवाभावी निवृत्त जवान, सरपंच, उपसरपंच, पीएच.डी. धारक आणि क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. यावेळी श्री. कुंडलिक गोरे यांनी आपल्या संघर्षमय जीवनप्रवासाच्या आठवणी सांगत साहित्य प्रवासा मागील प्रेरणा मांडली. “माझे लेखन हे समाजप्रबोधनासाठी असून सामाजिक बांधिलकी जपत पुढेही लेखन सुरू ठेवणार,” असे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

या प्रसंगी श्री. संतोष बोबडे (सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, तुळजापूर), रामदास गोरे, गौतम सोनवणे, श्री. व्यंकटेश जोशी आणि श्री. सुधाकर आरसुडे यांनी मनोगते व्यक्त करत श्री. गोरे यांच्या कार्याचे कौतुक केले. अध्यक्षीय समारोपात डॉ. विनय आपसिंगकर यांनी सविस्तर विचार मांडताना सांगितले की, साहित्य, शिक्षण आणि समाजसेवा ही त्रिसूत्री समाज परिवर्तनाची खरी ताकद आहे. श्री. कुंडलिक गोरे यांनी या तिन्ही क्षेत्रांचा समन्वय साधत आपल्या लेखणीतून समाजातील वास्तव मांडले, तर प्रत्यक्ष कार्यातून मूल्याधिष्ठित समाजनिर्मितीला हातभार लावला. त्यांच्या साहित्यकृतींमधून केवळ मनोरंजन नव्हे, तर सामाजिक जाणीवा जागृत करण्याचे मोठे कार्य होत असल्याचे त्यांनी नमूद केले. ग्रामीण भागातील वास्तवाला शब्दबद्ध करून समाजमनात परिवर्तनाची ठिणगी पेटवणारे लेखक म्हणून गोरे यांचे योगदान विशेष उल्लेखनीय असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनावेळी श्रीकृष्ण कुंडलिक गोरे यांनी आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा देताना आईच्या स्मृतींनी भावूक होत कंठ दाटून आल्याचे व्यक्त केले. त्यांनी सर्व मान्यवर, उपस्थित आणि सहकार्य करणाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बलराम गोरे, राणी गोरे, श्वेता गोरे, वैशाली व भाग्यश्री गोरे, गणेश चादरे, किरण गोरे, राहुल गोरे, दयानंद हाके, दीपक थोरात, नवनाथ आलमले, डॉ. दिगंबर भाकरे तसेच समस्त गोरे परिवार यांनी अथक परिश्रम घेतले.

 
Top