कळंब (प्रतिनिधी)- येथील वसुंधरा बहुउद्देशीय सामाजिक संस्था व इंडिविस वेल्फेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 1 मे 2026 रोजी जनरल ड्युटी असिस्टंट कोर्सचा शुभारंभ करण्यात आला. या कोर्सच्या माध्यमातून प्राथमिक स्वरूपाच्या वैद्यकीय सेवा देण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण युवक-युवतींना दिले जाणार आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. रमेश जाधवर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “शिक्षणातून मिळवलेल्या पदव्या या खऱ्या अर्थाने जीवन घडवतात. आयुष्यात सतत शिकत राहणे आवश्यक असून, घेतलेले ज्ञान कधीही वाया जात नाही.” ते पुढे म्हणाले की, बदलत्या सामाजिक परिस्थितीत एकत्र कुटुंब पद्धती कमी होत असून, एकल कुटुंबांमध्ये वृद्धांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत प्रशिक्षित युवकांनी वृद्धांची सेवा करणे तसेच आपत्कालीन काळात प्रथमोपचार व प्राथमिक वैद्यकीय मदत देणे अत्यंत गरजेचे आहे. यावेळी डॉ. अनिगुंटे यांनीही आपले विचार मांडताना सांगितले की, समाजाची गरज ओळखून युवक-युवतींना रोजगारक्षम बनवण्यासाठी आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी असे उपयोजित प्रशिक्षण उपक्रम राबविणे आवश्यक आहे.

कार्यक्रमास डॉ. रुपेश कवडे, संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. नवनाथ करंजकर, संचालक दत्तात्रय गायकवाड तसेच ओम हॉस्पिटल येथील कर्मचारीवर्ग, प्रशिक्षणार्थी विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि प्रशिक्षिका कु. छाया वाघमारे उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. करंजकर यांनी उपस्थितांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

 
Top