धाराशिव (प्रतिनिधी)- भारत निवडणूक आयोगाने दि.18 मे 2026 रोजी विधान परिषदेची स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-2026 (उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ) कार्यक्रम जाहीर केला असून,कार्यक्रम जाहीर होताच आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक साहित्याच्या छपाईसंदर्भात जिल्हा प्रशासनाने निर्बंध जाहीर केले आहेत.
भारत निवडणूक आयोग,नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 मधील कलम 127-अ अंतर्गत निवडणूक पत्रके व भित्तीपत्रकांच्या छपाईवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार छपाई व्यवसाय करणाऱ्या सर्व प्रेसधारकांनी नमुन्यातील प्रतिज्ञापत्र तातडीने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी,धाराशिव यांच्याकडे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.या संदर्भात अधिक माहिती तसेच प्रतिज्ञापत्र मिळविण्यासाठी संबंधित प्रेसधारकांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी,धाराशिव यांच्याकडे प्रतिज्ञापत्र सादर केल्याशिवाय कोणत्याही उमेदवार, त्यांच्या प्रतिनिधी किंवा राजकीय पक्षासाठी निवडणुकीसंदर्भातील छपाई करणाऱ्या प्रेसधारकांविरुद्ध लोकप्रतिनिधित्व अधिनियमातील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.या संदर्भातील सविस्तर सूचना कार्यालयीन वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिव येथे उपलब्ध असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.