धाराशिव (प्रतिनिधी)-  विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-2026 च्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी धाराशिव,लातूर आणि बीड जिल्ह्यांमध्ये परवानाधारक शस्त्रास्त्रे वाहून नेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अन्वये हा आदेश निर्गमित केला आहे.

भारत निवडणूक आयोगाने 18 मे 2026 रोजी प्रसिद्ध केलेल्या विधान परिषदेची स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक -2026 (उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ) निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून,कार्यक्रम जाहीर झाल्यापासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत,निर्भय आणि न्याय वातावरणात पार पडावी, यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक 13 मार्च 1996 आदेशान्वये देण्यात आलेल्या निर्देशांच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून निकाल जाहीर होईपर्यंत कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने परवाना दिलेली शस्त्रास्त्रे वाहून नेण्यावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. प्रत्येक शस्त्र परवाना धारकास स्वतंत्र नोटीस देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेणे सद्यस्थितीत शक्य नसल्याने एकतर्फी आदेश काढणे आवश्यक असल्याची खात्री झाल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

या आदेशानुसार शासकीय कर्तव्य बजावणारे अधिकारी-कर्मचारी, दंडाधिकारी अधिकार प्राप्त अधिकारी-कर्मचारी तसेच बँकांच्या सुरक्षा व्यवस्थेवरील अधिकारी -कर्मचारी यांना वगळता इतर सर्व परवानाधारकांना शस्त्रास्त्रे वाहून नेण्यास बंदी राहणार आहे. हा आदेश धाराशिव,लातूर आणि बीड जिल्ह्यांमध्ये आदेश निर्गमित झाल्याच्या तारखेपासून 25 जून 2026 पर्यंत लागू राहणार असून,हा आदेश 18 मे 2026 रोजी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आला आहे.


 
Top