धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील जागजी येथील एनव्हीपी शुगर प्रा.लि. या कारखान्यात 2026-27 च्या तृतीय गळीत हंगामाचे मिल रोलर पूजन सोमवारी (दि 25) कारखान्याचे चेअरमन श्री. नानासाहेब उर्फ बालाजी पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. अमृता पाटील यांच्या शुभहस्ते विधिवत पूजन करून करण्यात आले.
एनव्हीपी शुगर प्रा.लि. या कारखान्याने चाचणी गळीत हंगामापासून सलग तीन वर्षे कारखान्यास गाळपास आलेल्या संबंधित शेतकऱ्यांचे ऊसाचे बिल पंधरवाडा संपल्यावर दर महिन्याच्या 1 व 16 तारखेला अदा केलेले आहे. यापुढे ही परंपरा कायम ठेवण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.
गळीत हंगाम 2026-27 च्या हंगामात पूर्ण क्षमतेने कारखाना चालवून 1 लाख 50 हजार मे.टन गाळप करण्यात येईल. तोडणी-वाहतुकीचे करार पूर्ण करुन ठेकेदारांना पहिला हप्ता देण्यात आला. कारखाना निर्धारित वेळेत 01 ऑक्टोबरपूर्वी संपूर्ण कामे पूर्ण करून कारखाना सुरू करण्याची तयारी ठेवावी. अशा सुचना यावेळी चेअरमन श्री. नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी दिल्या.
याप्रसंगी मुख्य शेतकी अधिकारी जयवंत रोहिले, चिफ इंजिनिअर ओंकार मोकाशे, विजय वाघे, प्रविण पाटील, सुमित मोरे, अजय गाडे, सुधाकर खोत, परचेस अधिकारी रवि जोगदंड, सेल्स ऑफिसर सागर शिंदे, लेबर ऑफिसर शुभम सावंत, राजाभाऊ केवळराम, खयुम मुलानी, सह सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.
