धाराशिव (प्रतिनिधी)- अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित 32 व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी आमदार कैलास पाटील यांची निवड करण्यात आली आहे. रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील साहित्य संमेलन कार्यालयात अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी आमदार कैलास पाटील यांनी जेष्ठ साहित्यिक प्रा. भास्कर चंदनशिव यांना मरणोत्तर साहित्य जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचे सांगितले.
यावेळी साहित्य परिषदेचे विश्वस्त ज्ञानेश्वर पतंगे, मराठवाडा उपाध्यक्ष तुकाराम गंगावणे, धाराशिव जिल्हाध्यक्ष प्रा. राजा जगताप, महिला जिल्हाध्यक्षा मीना महामुनी, जिल्हा संघटक ॲड. दिलीप कांबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 29 आणि 30 मे रोजी लोकनेते अजितदादा पवार साहित्य नगरी धाराशिव येथे हे साहित्य संमेलन संपन्न होणार आहे. चंदनशिव यांना देण्यात येणाऱ्या या पुरस्कारामध्ये 51 हजार रुपये रोख, मानपत्र आणि स्मृतिचिन्हाचा समावेश असणार आहे. तसेच प्रा. भास्कर चंदनशिव यांच्या नावाने दरवर्षी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या साहित्यिकाला हा पुरस्कार दिला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
हे साहित्य संमेलन धाराशिवकरांसाठी साहित्याची मेजवानी ठरणार असून उद्घाटन सोहळा, परिसंवाद, कवी संमेलन, कथाकथन आणि चर्चासत्र असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या संमेलनात धाराशिवकरांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन आमदार कैलास घाडगे पाटील यांनी केले.
