धाराशिव (प्रतिनिधी)- शिवसेनेचे सुरज राजाभाऊ साळुंके यांच्यावर पक्षाने नवी जबाबदारी सोपवली आहे. शिवसेनेच्या धाराशिव लोकसभा प्रभारी सहसंपर्कप्रमुखपदी त्यांची निवड करण्यात आली असून पक्षाचे सचिव संजय मोरे यांनी नियुक्तीचे पत्र साळुंके यांना दिले आहे. निवडीनंतर शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव लोकसभा मतदारसंघात नव्या जोमाने पक्ष संघटन आणखी मजबूत करणार असल्याचे नूतन प्रभारी सहसंपर्कप्रमुख सूरज साळुंके यांनी सांगितले.
मुंबई येथे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या हस्ते शिवसेना धाराशिव लोकसभा प्रभारी सहसंपर्कप्रमुखपदी नियुक्तीचे पत्र देण्यात आले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री न एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या धाराशिव लोकसभा प्रभारी सह संपर्कप्रमुखपदी आपली नियुक्ती करण्यात येत असून नियुक्तीचा कालावधी एक वर्षाचा असेल, असे नियुक्ती पत्रात म्हटले आहे.
