तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या वृद्ध, अपंग व रुग्ण भाविकांच्या सोयीसाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या मोफत ई-रिक्षा सेवेला भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे, किरण यादव यांनी जिल्हाधिकारी कीर्तीकरण पुजारी यांच्याकडे केलेल्या तक्रारीनंतर प्रशासनाने तातडीने दखल घेत आर्य चौक ते राजे शहाजी महाद्वार या मार्गावरही मोफत ई-रिक्षा सेवा सुरू केली आहे.
यापूर्वी भवानी रोड ते मंदिर महाद्वार या मार्गावरच ई-रिक्षा सुविधा उपलब्ध होती. मात्र राजे शहाजी महाद्वार ते आर्य चौक या भाविकांच्या मोठ्या वर्दळीच्या मार्गावर सुविधा नसल्याने वृद्ध, दिव्यांग आणि आजारी भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. याबाबत नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार मांडल्यानंतर प्रशासनाने तत्काळ सकारात्मक पावले उचलल्याचे दिसून आले.
नवीन सेवा सुरू झाल्यानंतर अनेक वृद्ध व अपंग भाविकांना मोठा दिलासा मिळाला असून, भाविकांकडून जिल्हाधिकारी तसेच मंदिर समितीचे आभार व्यक्त केले जात आहेत. अधिकमासाच्या पार्श्वभूमीवर तुळजापूरात भाविकांची प्रचंड गर्दी होत असताना ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे भाविकांनी सांगितले.
भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता आता पावणारा गणपती ते राजमाता जिजाऊ महाद्वार या मार्गावरही मोफत ई-रिक्षा सेवा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. विशेषतः वृद्ध आणि दिव्यांग भाविकांना लांब अंतर चालणे कठीण जात असल्याने ही सुविधा आवश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे.
सध्या अधिकमासामुळे तुळजापूरात लाखो भाविक दाखल होत आहेत. गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने दर्शन, सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेसोबत अशा सुविधांमध्येही वाढ करण्याची गरज व्यक्त होत आहे. भाविकांच्या सोयीला प्राधान्य देत प्रशासनाने आणखी प्रभावी नियोजन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
