धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील कळंब पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोन पोलिस अंमलदारांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) धडक कारवाई करत एका पोलिस कर्मचाऱ्याला 36 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. ही कारवाई सोमवारी (दि.11 मे) कळंब शहरातील होळकर चौकातून तांदुळवाडी मार्गावर असलेल्या गुलमोहर बिर्याणी हाऊससमोर करण्यात आली. याप्रकरणी अशोक दादाराव करवर (वय 34, पोलिस अंमलदार, पोलीस स्टेशन कळंब) याला ताब्यात घेण्यात आले असून दुसरा आरोपी सिद्धेश्वर प्रकाश शिंदे अंमलदार, याचा शोध सुरू आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचा कळंब येथे रिलॅक्स स्पा सेंटरचा व्यवसाय आहे. हा व्यवसाय सुरळीत सुरू ठेवण्यासाठी आरोपी पोलिस अंमलदार सिद्धेश्वर शिंदे यांनी पोलिस निरीक्षकांसाठी 20 हजार रुपये, तर अशोक करवर यांनी दुय्यम अधिकाऱ्यासाठी 20 हजार रुपये अशा एकूण 40 हजार रुपयांच्या हप्त्याची मागणी केली होती.
तक्रारदाराने वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली असता, अधिकाऱ्यांना भेटलात तर तुमचा स्पा व्यवसाय बंद करून कारवाई केली जाईल, अशी धमकी देत दोन्ही आरोपींनी जे काही बोलायचे असेल ते आमच्याशीच बोला, असे सांगितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याबाबत तक्रारदाराने 10 मे रोजी जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
यानंतर करण्यात आलेल्या पडताळणीत दोन्ही आरोपींनी पंचासमक्ष 36 हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार एसीबीने सापळा रचला. दि.11 मे रोजी तक्रारदाराकडून 36 हजार रुपयांची लाच स्वीकारताना अशोक करवर याला तक्रारदाराच्या स्विफ्ट कारमध्ये रंगेहात पकडण्यात आले. त्याच्या अंगझडतीत 36 हजार रुपयांची लाचेची रक्कम, 350 रुपये रोख, एक मोबाईल, कार व मोटारसायकलच्या चाव्या जप्त करण्यात आल्या आहेत. मोबाईल जप्तीची प्रक्रिया सुरू असून दोन्ही आरोपींच्या घरझडतीची कारवाईही सुरू असल्याची माहिती एसीबीने दिली. या प्रकरणी कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपी अशोक करवर याला गुन्हा नोंद झाल्यानंतर अटक करण्यात येणार आहे.
ही कारवाई बाळू संपती जाधवर, पोलिस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक विजय वगरे हे करत आहेत. या कारवाईस पोहेकॉ गजानन घायवट, पोलिस अंमलदार मनोहर भुतेकर, गणेश चेके, संदीपान लहाने, गजानन कांबळे व चालक भालचंद्र बिनोरकर यांनी सहकार्य केले.