धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करत तिला गरोदर करणाऱ्या खामसवाडी (ता. कळंब) येथील एका आरोपीला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. या गंभीर गुन्ह्यात न्यायालयाने आरोपीला 20 वर्षे सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये दंडाची कठोर शिक्षा सुनावली आहे.
या खटल्याची माहिती देताना अतिरिक्त शासकीय अभियोक्ता ॲड. अशिष कुलकर्णी यांनी सांगितले की, फिर्याद दाखल होण्याच्या सहा महिने अगोदरच्या काळात हा धक्कादायक प्रकार घडला होता. आरोपी किरण सुभाष तिबुले (रा. खामसवाडी, ता. कळंब, जि. धाराशिव) याने पीडित मुलीस जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर तिला स्वतःच्या घरात बोलावून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले, ज्यामुळे पीडित मुलगी गरोदर राहिली.
या भयंकर प्रकारानंतर पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून शिराढोण पोलीस ठाण्यात आरोपी किरण तिबुले याच्याविरुद्ध भा.द.वि. कलम 376 (3), 376 (2) (एन), 376 (2) (जे) तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोक्सो) अधिनियमाचे कलम 4, 6, 8 आणि 12 नुसार गुन्हा (गु.र.नं. 76/2023) दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा सखोल तपास करून तपासिक अधिकारी गंगाधर पुजेरवाड यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
या खटल्याची सुनावणी कळंब येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश-1 मा. आर. के. राजेभोसले यांच्या न्यायालयात पार पडली. सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण 10 साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये खुद्द पीडित मुलीची साक्ष, इतर साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष आणि सर्वांत महत्त्वाचा ठरलेला डी.एन.ए. अहवाल हे पुरावे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरले.
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील ॲड. अशिष कुलकर्णी यांनी भक्कम बाजू मांडली. सरकारी वकिलांचा युक्तिवाद आणि न्यायालयात सादर झालेले भक्कम साक्षी-पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने दिनांक 12 मे 2026 रोजी आरोपी किरण तिबुले याला भा.द.वि. कलम 376 (3) व पोक्सो कायद्याच्या कलम 6 नुसार दोषी ठरवले. न्यायाधीश आर. के. राजेभोसले यांनी आरोपीस 20 वर्षे सक्तमजुरी आणि 5,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली.