तुळजापूर (प्रतिनिधी)- माजीमंत्री, आमदार सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेला 48 वा सामुदायिक विवाह सोहळा रविवारी (दि.10 मे) धाराशिव येथे उत्साहात पार पडला. या सोहळ्यात 11 हिंदू जोडपी विवाहबंधनात अडकली.
विवाह सोहळ्यास हजारो वऱ्हाडी मंडळींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी लोकमंगल फाउंडेशनचे संस्थापक आमदार सुभाष देशमुख, रोहन देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विवाह सोहळ्यातील विशेष बाब म्हणजे श्रीकृष्ण पंडित पांचाळ (रा. सारणी, ता. लोहारा) या नवरदेवाने विवाहाच्या दिवशी रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जपली. यावेळी आयोजित रक्तदान शिबिरात एकूण 22 जणांनी रक्तदान केले. लोकमंगल फाउंडेशनने 2006 मध्ये सामुदायिक विवाह सोहळ्याची परंपरा सुरू केली असून यंदा या उपक्रमाला 20 वे वर्ष पूर्ण झाले आहे. गेल्या 20 वर्षांत 47 सामुदायिक विवाह सोहळे यशस्वीरीत्या पार पडले असून यंदाचा 48 वा सोहळा होता. या सर्व सोहळ्यांतून आतापर्यंत 3221 जोडपी विवाहबंधनात अडकली आहेत.
समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना या उपक्रमाचा मोठा आधार मिळत असून सामुदायिक विवाहामुळे अनावश्यक खर्चाला आळा बसत आहे. साधेपणाने विवाह करण्याची प्रेरणाही या माध्यमातून दिली जात आहे. धर्मनिरपेक्षतेचा आदर्श जपत विविध धर्मीय जोडप्यांनीही या उपक्रमात सहभाग घेतला आहे. गेल्या 21 वर्षांत हिंदू समाजातील 2508, बौद्ध समाजातील 681, मुस्लिम समाजातील 21, ख्रिश्चन समाजातील 4 तर जैन समाजातील 7 जोडपी या सामुदायिक विवाह सोहळ्यातून विवाहबद्ध झाली आहेत. यावेळी रामराजे पाटील, जयसिंह देशमुख, बालाजी शिंदे, सचिन आडगळे, लिंबराज साळुंके, रामदास अण्णा कोळगे, प्रभाकर मुळे, विजय शिंगाडे, गजानन वडणे, अनिल जाधव, बाबा बेटकर, मकरंद लबडे, श्याम गाटे, तानाजी पाटील, भास्कर बोंदर, मोहन खापरे, रमेश आप्पा रणदिवे व धाराशिव कोर्टाचे सरकारी वकील अमोल गुंड यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लोकमंगल परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
