तुळजापूर (प्रतिनिधी)- केंद्रातील भाजप सरकारने पेट्रोल, डिझेल व सीएनजीच्या दरात केलेल्या वाढीविरोधात तुळजापूर तालुका काँग्रेस सेवादल कमिटी (आय) आक्रमक झाली असून, मंगळवारी तहसीलदार कार्यालयावर धडक देत शासनाच्या धोरणांविरोधात जोरदार निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार प्रियांका लोखंडे -काळे यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, मागील 10 ते 12 दिवसांत इंधन दरात झालेल्या मोठ्या वाढीमुळे सामान्य नागरिकांसह शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी ट्रॅक्टर व शेती मशागतीसाठी मोठ्या प्रमाणावर डिझेलची आवश्यकता असताना इंधन महागल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. तसेच वाहतूक खर्च वाढल्याने अन्नधान्य, खाद्यतेल आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीतही वाढ झाली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.

मागील हंगामातील प्रलंबित पीक विमा रक्कम पात्र शेतकऱ्यांना तात्काळ वितरित करावी, खरीप पीक कर्ज वाटप करताना शेतकऱ्यांचा ‌‘सिबील स्कोअर' न पाहता शासन आदेशानुसार कर्ज मंजूर करावे, तसेच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी, अशा प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. यामध्ये विलास शाळू, महाराष्ट्र प्रदेश सेवादल सचिव शिवाजी गायकवाड,  तानाजी जाधव,  सत्तार मुलाणी,  रमेश बनसोडे, संजय गुंजुटे, ॲड. सय्यद मुश्ताक, फरिद शेख, नारायण जाधव, इस्माईल हारुण, विकास मोरे, गोविंद डोंगरे, रसिक महमूद वाले, रावसाहेब भगवान शेंडे, प्रा. मोहनराव सिद्धराम चमू, बाबासाहेब इंगळे, मोईश सय्यद शेखापूरकर यांच्यासह तालुक्यातील शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


 
Top