कळंब (प्रतिनिधी)- दोन वर्षं उशिरा लागलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत संजय पांडुरंगजी मुंदडा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कळंब नगर परिषदेतील दहा नगरसेवकांच्या स्वाक्षरीने सुचवलेली सदर उमेदवारी लढवण्यावर संजय मुंदडा ठाम आहेत. महाविकास आघाडीचे नेते खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्याकडे उमेदवारी मागणी केली आहे.

आजतागायत या मतदारसंघातून निवडून जाणा-या लोकप्रतिनिधींनी स्थानिक स्वराज्य संस्था विषयक समस्या बाबतीत दाखवलेली उदासीनता हीच माझ्या उमेदवारीचे प्रमुख कारण असल्याचे मुंदडा यांनी स्पष्ट केले. 1960 च्या दशकातील अनेक कायदे व नियम आज कुचकामी ठरत आहेत. क वर्ग नगरपालिकेतील विषय समिती चे तोकडे अधिकार व त्या निर्णयावरही अध्यक्ष व मुख्याधिकारी यांचा असणारा वरचष्मा हा त्या समितीला निष्प्रभ करतो, अध्यक्षांचा अधिकारी व कर्मचारी यांच्या वरील अंकुश सिमीत केल्यामुळे लालफितीची वाढती मनमानी, भूमीहीन लोकांचे अतिक्रमण नियमीत करताना घातलेले दंडक त्याच्या उद्देशाला बाधक ठरतात. सार्वजनिक स्वच्छतेसारख्या महत्वाच्या निवीदा अंतीम करताना लघुत्तम दर हेच अंतिम करण्याचे निकष असल्याने सभागृहाचे अधिकार मर्यादित ठरतात व आरोग्य धोक्यात येणारे काम होते. 

या व अशा अनेक बाबतीत या मतदारसंघातून निवडून जाणा-या लोकप्रतिनिधींनी आवाज उठवून समस्या सोडवणे अभिप्रेत होते. परंतु निवडणूक लढवणार या मतदारसंघातून व विषय हाताळायचे दुसरेच. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था व सरकार मधील दुवाच क्षीण झाल्याचे जाणवते. हा मतदारसंघ ज्या उद्देशाने बनवलाय त्यालाच हरताळ फासला गेलाय. म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांना ख-या अर्थाने न्याय मिळवून देण्यासाठी मी निवडणूक लढवणार असल्याचे मुंदडा यांनी स्पष्ट केले.

आगामी काळात तिन्ही जिल्ह्यात दर तिमाहीला स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन समस्या जाणून घेत शासन दरबारी पाठपुरावा करून त्या समस्या सोडवणे हेच आपले उद्दिष्ट असल्याने निवडणुकीत सर्वपक्षीय नेत्यांनी आपल्याला पाठिंबा द्यावा असे आवाहन त्यांनी केले. संजय मुंदडा यांना नगरसेवक, सभापती, गटनेता, उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष असा विस वर्षाचा अनुभव व अभ्यास आहे. नामनिर्देशन पत्रावर सुचक म्हणून अर्चना प्रताप मोरे, आशा सुधीर भवर, इंदुमती जयनंदन हौसलमल, ज्योती दिपक हारकर, वनमाला शंकर वाघमारे, सफूरा शकील काझी, रुखसाना चाँदसाब बागवान, सागर सुभाष मुंडे, मोसीन सलीम मिर्झा, जमील महम्मद कासीम खाटीक यांच्या सह्या आहेत.

 
Top