धाराशिव (प्रतिनिधी)-  जेईई, नीट आणि आयआयटी सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज नाही. यासाठी संस्थेने धाराशिवमध्ये “फिजिक्स वाला“ हा उत्तम पर्याय उपलब्ध करून दिला आहे. धाराशिवचा विद्यार्थी धाराशिव मध्येच घडला पाहिजे व आपला एक वेगळाच ‌‘धाराशिव पॅटर्न' तयार झाला पाहिजे. असे प्रतिपादन आर्दश शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी केले. 

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीपतराव भोसले जुनियर कॉलेज व फिजिक्स वाला, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी धाराशिव, तुळजापूर, उमरगा, लोहारा, कळंब, वाशी, भूम, परंडा, औसा व बार्शी तालुक्यातील 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या तसेच प्रत्येक शाळेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या एकूण 430 हून अधिक विद्यार्थ्यांचा, त्यांच्या पालकांचा आणि 40 हून अधिक मुख्याध्यापकांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सोमनाथ वाडकर (तहसीलदार, देवणी, जि. लातूर) यांची उपस्थिती लाभली. प्रास्ताविकात बळीराम पवार यांनी फिजिक्स वालाच्या यशस्वी वाटचाल व सुविधा याविषयी माहिती दिली. यावेळी अंकित कुमार यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य राखण्याचे महत्त्व अधोरेखित केले. तर विजय वर्मा यांनी पालकांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी योग्य निर्णय घेण्याची गरज व्यक्त केली.

कार्यक्रमास सरचिटणीस  प्रेमाताई पाटील, संस्थेचे सीईओ आदित्य पाटील, संचालक उदयसिंह राजे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप जगताप, सूर्यकांत पाटील, कमलाकर पाटील यांनी केले. तर आभार प्राचार्य नंदकुमार नन्नवरे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top