धाराशिव (प्रतिनिधी)- महिलांच्या गळ्यातील मणिमंगळसूत्र व सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने अटक केली असून, चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींकडून सुमारे 8 लाख 38 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे तुळजापूर व येरमाळा परिसरातील चोरीच्या चार गुन्ह्यांची उकल झाली आहे.
धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर व येरमाळा येथील पोलीस ठाण्यात मनी मंगळसूत्र व सोन्याचे गंठण चोरी झाल्याचे गुन्हे दाखल झाले होते. गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला हे गुन्हे तातडीने उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार 15 मे 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार व त्यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे वाशी येथील पारगाव टोल नाक्यावर सापळा रचला. यावेळी संशयित स्कॉर्पिओ वाहनासह दोन महिला व दोन पुरुषांना ताब्यात घेण्यात आले. पोलीसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी त्यांच्या इतर साथीदारांसह तुळजापूर व येरमाळा परिसरात भाविक महिलांच्या गळ्यातील मणिमंगळसूत्र व सोन्याचे गंठण चोरी केल्याची कबुली दिली.
आरोपींकडून सुमारे 27 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली महिंद्रा स्कॉर्पिओ असा एकूण 8 लाख 38 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत तुळजापूर पोलीस ठाण्यातील 1 व येरमाळा पोलीस ठाण्यातील 3 असे एकूण 4 चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अनिता सुनील शिंदे, हिराबाई रमेश शिंदे, चिरंजीव रमेश शिंदे, किरण शेषेराव शिंदे यांचा समावेश आहे. सर्व आरोपी रा. पिंपळगाव तांडा, ता. अंबड, जि. जालना येथील रहिवासी आहेत. आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी येरमाळा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोलीस हवालदार शौकत पठाण, जावेद काझी, फरहान पठाण, महिला पोलीस हवालदार शोभा बांगर, महिला पोलीस कॉन्स्टेबल बहिरवाड (पोस्टे वाशी), तसेच रत्नदीप डोंगरे व नागनाथ गुरव यांच्या पथकाने पार पाडली.
