धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि विकास कामांचा आढावा घेण्यासाठी 'जिल्हा विकास समन्वय आणि लक्षवेधी समिती' (दिशा) ची महत्त्वाची आढावा बैठक सोमवार, दिनांक 18 मे 2026 रोजी आयोजित करण्यात आली आहे. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे. 

केंद्र आणि राज्य सरकारच्या ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध लोककल्याणकारी योजनांचा प्रगती अहवाल, निधीचा विनियोग आणि प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांची कडक सूचना: “या बैठकीचे गांभीर्य ओळखून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तसेच इतर सर्व संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः आवश्यक ती सर्व अद्ययावत माहिती, आकडेवारी आणि कागदपत्रांसह बैठकीला वेळेवर उपस्थित राहावे. कोणत्याही अधिकाऱ्याने अनुपस्थित राहू नये किंवा प्रतिनिधी पाठवू नये, अन्यथा त्याची गंभीर दखल घेतली जाईल.“ जिल्ह्यातील विकासकामांना गती देणे आणि योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश असून, सर्व संबंधित विभागांनी पूर्वतयारीसह उपस्थित राहावे, असे आवाहन खासदार कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.


 
Top