भुम (प्रतिनिधी)- ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था ही खऱ्या अर्थाने जनसामान्यांच्या जीवनाचा आधारवड असते. याच धारणेतून, मौजे गिरवली (ता. भूम, जि. धाराशिव) येथील आरोग्य उपकेंद्राच्या नूतन आणि सुसज्ज इमारतीचा लोकार्पण सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला.
धाराशीवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ऑनलाइन पद्धतीने या वास्तूचे लोकार्पण करून गिरवलीकरांच्या सेवेत ही आरोग्य मंदिर रुपी इमारत समर्पित केली. विद्यमान काळाची गरज ओळखून उभारण्यात आलेल्या या नूतन इमारतीमुळे गावच्या आरोग्य सेवेला आता आधुनिकतेची जोड मिळाली आहे. ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा पोहोचवणे हे आमचे ध्येय असून, गिरवलीचे हे उपकेंद्र आरोग्याची नवी पहाट घेऊन येईल. असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या सोहळ्याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या शुभांगी सुनील देशमुख, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब खरवडे आणि गिरवलीचे सरपंच संजय मोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. ईट प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पन्हाळे, जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सूरज मोटे, अक्षय मोटे, सौरभ देशमुख, रत्नदीप मोटे यांसह उपकेंद्राचे सर्व कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
