परंडा (प्रतिनिधी)-“नसरापूर (ता. भोर जि. पुणे) येथे 4 वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचार व निर्घृण हत्येच्या घटनेचे पडसाद परंडा तालुक्यात उमटले आहेत. या घटनेचा निषेध करण्यासाठी परंडा शहरातील सकल समाज बांधव आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्र येत तहसीलदार साहेबांना निवेदन सादर केले.

पुणे येथील या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, परंडा तालुक्यातील ग्रामस्थांनी या नराधमाचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. यावेळी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. तसेच पीडित कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत व संरक्षण देण्याची विनंतीही करण्यात आली. या प्रसंगी समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने परिसरातील जनता उपस्थित होती. “अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कायद्याचा धाक निर्माण होणे गरजेचे आहे. अशी भावना उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनाही माहितीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.“


 
Top