भूम (प्रतिनिधी)- येथील 1987-88 च्या एस.एस.सी. बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचा प्रेरणादायी उपक्रम राबविला. श्री पपन घुले व सचिन शेंडगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा गौरव करण्यात आला.

मार्च 2026 मध्ये झालेल्या एस.एस.सी. परीक्षेत कु. संध्या श्रीकांत शेळके हिने 96.80 टक्के गुण मिळवत गुरुदेव हायस्कूल, भूम येथून द्वितीय क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे इंग्रजी विषयात तब्बल 98 गुण मिळवून तिने जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळविला. तिच्या या यशाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले. तसेच कु. वेदांगी विठ्ठल गुंजाळ हिने महाराष्ट्र विद्यालय, बार्शी येथून 88 टक्के गुण मिळविले. कु. किमया सचिन शेंडगे हिने 73.80 टक्के, मेहराज अनिस सय्यद याने 83 टक्के तर यश रुपेश शेंडगे याने 73 टक्के गुण संपादन करून यश मिळविले. इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत कु. वृंदा विठ्ठल गुंजाळ हिने 210 गुण मिळवून विशेष प्राविण्य मिळविले. तसेच हर्षद पपन घुले याने बारावी विज्ञान शाखेत 73 टक्के गुण मिळवून यश संपादन केले.

या प्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा पुष्पगुच्छ, शाल व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी 1987-88 बॅचचे ॲडमिन कैलास शेंडगे यांच्यासह सर्व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. उपस्थितांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विठ्ठल गुंजाळ यांनी केले. तर ज्ञानेश्वर केदारी यांनी उपस्थित मान्यवर, मित्रपरिवार व गुणवंत विद्यार्थ्यांचे आभार मानले. कार्यक्रमानंतर वाढदिवसानिमित्त आयोजित स्नेहभोजनाचा सर्वांनी आस्वाद घेतला आणि उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.

 
Top