तुळजापूर  (प्रतिनिधी)-  अधिक मास, शनिवार-रविवारच्या सलग सुट्ट्या आणि दुर्गाष्टमीच्या पार्श्वभूमीवर शनिवार साप्ताहिक सुट्टी रविवार  पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी दर्शवणार  भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती.

राज्यासह परराज्यातील हजारो भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी तुळजापूरकडे धाव घेतली होती. मंदिर परिसर, दर्शन रांगा तसेच शहरातील प्रमुख मार्ग भाविकांनी फुलून गेले होते. अधिक मासातील दुर्गाष्टमी निमित्त अनेक देवीभक्तांनी श्री तुळजाभवानी मातेचा कुलधर्म आणि कुलाचार मोठ्या भक्तिभावाने पार पाडला. महिला भक्तांकडून अनारसे, बतासे, दिवे, पुरणाचे धोंडे आदी पारंपरिक नैवेद्य अर्पण करण्यात येत होते. “अधिक मासातील दर्शन पुण्यप्रद मानले जाते,” अशी भाविकांची श्रद्धा असल्याने यंदा भाविकांचा ओढा मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. अधिक मास सुरू झाल्यापासून दररोज हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करत असून, विशेषतः मंगळवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी गर्दीचा उच्चांक होत आहे. भाविकांच्या वाढत्या संख्येमुळे मंदिर प्रशासनालाही व्यवस्था सांभाळताना मोठी कसरत करावी लागत आहे.

दरम्यान, वाढती गर्दी लक्षात घेता प्रशासनाने रेफरल पास सेवा तात्पुरती बंद केली आहे. सध्या फक्त 200 रुपये आणि 500 रुपयांचे दर्शन पास सुरू ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य भाविकांना तासन्तास रांगेत थांबून दर्शन घ्यावे लागत असल्याचे चित्र आहे. याचबरोबर अभिषेक रांगेसंदर्भात काही भाविकांनी गंभीर तक्रारी केल्या आहेत. संभाजी प्रांगणातील सुरू असलेल्या पाडकामाच्या ठिकाणाहून काही भाविक थेट अभिषेक रांगेत प्रवेश करत असल्याचा आरोप भाविकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे रांगेत उभ्या असलेल्या भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. सदर प्रकार रोखण्यासाठी मंदिर समितीने तात्काळ योग्य ती उपाययोजना करावी, संबंधित ठिकाणी सुरक्षा वाढवावी आणि घुसखोरी रोखण्यासाठी कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी भाविकांकडून होत आहे. अधिक मास संपेपर्यंत तुळजापूरमध्ये भाविकांचा ओघ असाच कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, मंदिर प्रशासनासमोर गर्दी नियंत्रणाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.


 
Top