भूम (प्रतिनिधी)- भोर, जि. पुणे येथील नरसापूर परिसरात महाराष्ट्र दिनाच्या दिवशी घडलेल्या अल्पवयीन बालिकेवरील अत्याचार व निघृण हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ जनशक्ती नगर विकास आघाडी, भूम यांच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला निवेदन देत आरोपीवर कठोर कारवाई करून पीडितेला जलद न्याय देण्याची मागणी केली आहे.
सदर निवेदन उपविभागीय अधिकारी, भूम यांच्या मार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, ही घटना अत्यंत संतापजनक असून संपूर्ण समाजमन हेलावून टाकणारी आहे. अशा अमानुष घटनांमुळे समाजात भीती व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होत आहे. प्रकरणाचा निष्पक्ष व जलद तपास, आरोपीवर कठोर कायद्यांनुसार गुन्हा दाखल करणे, प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात चालवणे, पीडित कुटुंबाला आर्थिक व मानसिक मदत देणे तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याची मागणी केली आहे.
यावेळी उपनगराध्यक्ष लक्ष्मी साठे, बांधकाम सभापती अनिल शेंडगे, नगरसेवक सुनीता वीर, शमशाद मुजावर, चंद्रमणी गायकवाड, नुरजहां मनीयार, चंद्रकला पवार, नगरसेवक विठ्ठल बागडे, पाणी पुरवठा सभापती नवनाथ रोकडे, नियोजन सभापती रामराजे कुंभार, अमोल वीर, प्रदीप साठे, इम्रान मुजावर, राहुल पवार आणि महेंद्र गायकवाड उपस्थित होते. जनशक्ती नगर विकास आघाडीच्यावतीने या निंदनीय घटनेचा जाहीर निषेध नोंदविण्यात आला असून आरोपीस कठोरात कठोर शिक्षा देऊन पीडितेला न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.