धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा विधीज्ञ मंडळाच्या वार्षिक निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी यंदा चुरस निर्माण झाली होती. अध्यक्ष पदाची निवडणूक लढविणाऱ्या ॲड. खंडेराव हरिश्चंद्र चौरे यांनी 198 मताधिक्याने विजयश्री मिळविला आहे. त्यांनी ॲड. सुधाकर तांबे यांचा पराभव केला आहे. ॲड. तांबे यांना या निवडणुकीत 134 मते मिळाली आहेत.
जिल्हा विधीज्ञ मंडळाच्या वार्षिक निवडणुकीत बिनविरोध निवड झालेले उमेदवार वगळता अध्यक्ष, उपाध्यक्ष (सर्वसाधारण), उपाध्यक्ष (महिला राखीव) आणि महिला प्रतिनिधी या चार पदांसाठी चुरशीची लढत झाली. सर्वसाधारण उपाध्यक्ष पदासाठी ॲड. इंद्रजित चिंतामणराव शिंदे व ॲड. सुधीर विठ्ठलराव नन्नवरे यांच्यात लढत झाली. एकूण 514 मतांपैकी ॲड. नन्नवरे यांना 414 तर ॲड. शिंदे यांना केवळ 78 मते मिळाली. ॲड. नन्नवरे यांनी 336 मतांच्या फरकाने विजयश्री मिळविला आहे. उपाध्यक्ष (महिला राखीव) पदासाठी झालेल्या निवडणुकीत ॲड. सारीका नागनाथ मुंडे-पाटील व ॲड. उज्वला गोरख इंगळे यांच्यात लढत झाली. 519 वैध मतांपैकी ॲड. सारीका मुंडे यांना 295 मते तर ॲड. उज्वला इंगळे यांना 202 मते पडली आहेत. मुंडे यांनी इंगळे यांचा 93 मतांच्या फरकाने पराभव केला आहे. महिला प्रतिनिधी पदासाठी ॲड. अर्चना रामहरी नवले व ॲड. मायादेवी सुभाष सरवदे यांच्यात चुरशीची लढत झाली. या लक्षवेधी लढतीत ॲड. अर्चना रामहरी नवले यांनी ॲड. मायादेवी सरवदे यांचा तब्बल 214 मतांनी पराभव करत विजयश्री मिळविली आहे.
या निवडणुकीत मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. नितीन भोसले यांनी काम पाहिले. दरम्यान निवडणूक निकाल जाहीर होताच विजयी उमेदवाराच्या समर्थकांनी सर्व विजयी उमेदवारांचा सत्कार करून, गुलाल उधळून विजयोत्सव साजरा केला. ॲड. चौरे हे भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष असून भाजपा पक्षातील सक्रिय पदाधिकारी आहेत.
