कळंब (प्रतिनिधी)- शहरासह ग्रामीण भागाला वीज पुरवठा करणाऱ्या महावितरण च्या मुख्य सबस्टेशनला आज दुपारी दोनच्या सुमारास भीषण आग लागून मोठे नुकसान झाले. या आगीत ग्रामीण भागाला वीज पुरवठा करणारा मोठा डीपी पूर्णपणे जळून खाक झाला असून, शहराला पुरवठा करणाऱ्या डीपीचेही मोठे नुकसान झाले आहे.
या घटनेमुळे दुपारी साधारण दोन वाजल्यापासून कळंब शहरासह परिसरातील वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला असून, वीज कधी पूर्ववत होईल याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
अधिकारी गायब; संपर्कही नाही!
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आग लागली त्या वेळी संबंधित कार्यालयात एकही सक्षम अधिकारी उपस्थित नव्हता. नागरिकांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मोबाईल बंद तर कनिष्ठ अभियंत्याने फोन उचलण्याचे टाळल्याचा आरोप होत आहे.
यामुळे प्रशासनाच्या निष्काळजीपणावर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.
वारंवार घटना; तरीही धडा नाही!
काही दिवसांपूर्वीच शहरातील बस स्टॉपजवळील डीपीला आग लागण्याची घटना घडली होती. त्यावेळी मोठी दुर्घटना टळली होती. मात्र, त्यानंतरही कोणतीही ठोस उपाययोजना न केल्यामुळे आजची गंभीर घटना घडल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
नागरिकांचा संताप उफाळला
या घटनेनंतर शहरात मोठी खळबळ उडाली असून, महावितरणच्या कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
“वारंवार वीज खंडित होते, तक्रार केली तरी अधिकारी लक्ष देत नाहीत. आज तर आग लागली तरी कोणी जबाबदार अधिकारी हजर नव्हता. ही सरळ निष्काळजीपणा आहे!”
ॲड . मनोज चोंदे कळंब
चौकशी व कारवाईची मागणी !
नागरिकांनी या घटनेची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या तात्काळ बदल्या कराव्यात. निष्काळजीपणाबद्दल निलंबन/बडतर्फी करावी, वीज पुरवठा व्यवस्थेत सुधारणा करावी.
अग्निशमन दलाने आग आटोक्यात
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते. महावितरणचा ढिसाळ कारभार आणि अधिकाऱ्यांची बेपर्वाई यामुळे कळंब अंधारात ढकलले गेले आहे. आता तरी वरिष्ठ प्रशासन जागे होणार का, की नागरिकांना अजूनही अशाच संकटांना सामोरे जावे लागणार? हा सवाल उपस्थित होत आहे.
मी जरा बाहेर होतो ही घटना कशी घडली का घडली याबाबत मला अद्याप काही माहिती नाही. याची सखोल माहिती घेऊन त्यात काही उपाययोजना करता येतील का? ते आता आम्ही पाहणार आहोत. त्यामुळे रात्री वीजपुरवठा सुरळीत होईल का नाही हे मी आता सांगू शकत नाही.
महावितरणचे सहाय्यक अभियंता - सौरभ टाखरखेडे
